

Happy World Post Day
'अतूट नाती जुळण्यासाठी- शोधा विश्वासार्ह दुवा, संदेशाच्या वहनासाठी तत्पर आहे टपाल सेवा…' या पंक्तीतून पोस्ट विभागाचे महत्त्व आणि विश्वासाची सेवा लक्षात येते. टपाल व्यवस्थेची सुरुवात 17 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. 1688 मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. इसवी सन 1774 मध्ये टपाल सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. 333 वर्षे पोस्टाची अखंड सेवा सुरू आहे. केवळ पत्र पोहोचवणे इतकी मर्यादित सेवा न देता काळानुरूप बदलत बचत, विक्री, बँक सेवा अशा अनेक क्षेत्रांत पोस्टाचे काम अखंड सुरू आहे. 2,200 विभागीय पोस्ट कार्यालये व 11 हजार 500 ग्रामीण शाखांच्या माध्यमातून पोस्टाची सेवा कार्यरत आहे.
भारतात 1854 मध्ये टपाल कायदा अस्तित्वात आला, या कायद्याने टपाल सेवेचा एकाधिकार टपाल खात्याला देण्यात आला. आज भारतीय टपाल सेवा ही दीड लाखावर टपाल कार्यालयांद्वारे सुरू आहे. हे जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे जाळे ठरले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. अशा काळात पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेंतर्गत 17 कोटींची देवाण-घेवाण झाली. पोस्टाच्या कर्मचार्यांनी पीपीई किट घालून हॉटस्पॉट, कन्टेन्मेंट झोनमध्ये सेवा दिली. विशेषत:, आजारी, ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना यामुळे मोठी मदत झाली. याशिवाय मोबाईल, वीज, टी.व्ही. यासह इतर अनेक पेमेंट पोस्टात भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. कोरोनाचा कहर वाढल्याने औषधांचा तुटवडा जाणवत होता. अशावेळी रुग्णांपर्यंत औषध पोहोचवण्यात पोस्टाने मोठी कामगिरी केली.
कोरोनाच्या महामारीत अवघा देश लॉकडाऊन असताना पोस्ट कार्यालये मात्र लोकांच्या अविरत सेवेत होती. लॉकडाऊन काळात राज्यातील पोस्टाने सुमारे 10 हजार कोटींची देवाण-घेवाण करत दीड कोटीपेक्षा अधिक लोकांना आधार दिला. ज्येष्ठांना पेन्शन थेट घरी पोहोचविण्याबरोबरच औषधांची हजारो पार्सल पोहोचवत रुग्णांच्या उपचारातही मदत केली.