

कोल्हापूर : दिवाळी सणाअंतर्गत झालेल्या भाऊबीजेच्या सणादिवशी लोकांनी मटण आणि चिकनवर यथेच्छ ताव मारला. यंदा बुधवार असल्याने आबालवृद्धांसह महिला वर्गानेही मांसाहाराचा आस्वाद घेतला. यामुळे दिवसभर मटण व चिकन खरेदीसाठी मटण मार्केटसह ठिकठिकाणाच्या दुकानांमोर खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शहरात सुमारे दोन हजार, तर जिल्ह्यात ५ हजार बकरी आणि सुमारे ३० टन कोंबड्या कापण्यात आल्या. माशांनाही मोठी मागणी असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. दरम्यान कोल्हापूरकरांच्या या खवय्येगिरीची चर्चा व्हिडीओसह सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
मटण-चिकनला पर्यायी मासे...
बुधवार असल्याने मटण, चिकनसाठी मोठी गर्दी होणार याचा अंदाज बांधून विक्रेत्यांनी आदले दिवशीपासूनच विशेष तयारी केली होती. पहाटे पाच वाजल्यापासून दुकाने उघडण्यात आली होती. सकाळी ७ वाजल्यापासून लोक मटण खरेदीसाठी जवळपासच्या दुकानांमध्ये पोहोचले होते. अनेक मटण दुकानांसमोर लांबलचक रांगा असल्याने अनेकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून चिकनच्या दुकानात गर्दी केली. चिकनच्या दुकानांसमोरही रांगा लागल्याने अनेकांनी थेट फिश मार्केट गाठले. अनेकांना सकाळच्या सत्रात मटण-चिकन न मिळाल्याने त्यांनी रात्रीच्या जेवणाचे नियोजन करून दुपारनंतर खरेदी केली.
शहरातील सर्व पेठा, उपनगरे आणि आसपासच्या ग्रामीण भागातील मटण-चिकनच्या दुकानांसमोर दिवसभर ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. मटणाचा दर ८५० रुपये तर चिकनचा दर ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता.
कसबा बावड्यातही मटणासाठी गर्दी
कसबा बावडा : भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जेवायला जाणाऱ्या भावासाठी खास मटणाचा बेत करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आजही कायम आहे. काही घरांमध्ये बहिणी स्वतः भावाच्या आवडीचे पदार्थ बनवतात; तर काही ठिकाणी भावंडे एकत्र येऊन मटणाच्या जेवणाचा आनंद लुटतात. त्यामुळे बुधवारी सकाळीच कसबा बावडा येथेही अनेकांनी मटण खरेदीसाठी दुकानांकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी रांगा दिसून आल्या. सणासुदीच्या या निमित्ताने मटण विक्रेत्यांचीही चांगलीच लगबग सुरू होती.