

कसबा बावडा : शहर आणि परिसरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे भीषण वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे. जयंती नाल्यासह विविध नाल्यांतून वाहून आलेला तब्बल 50 टन कचरा राजाराम बंधार्यात अडकला असून, प्रदूषणामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाने शहरातील नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यासोबतच प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल, चपला, पॅकिंग मटेरियल अशा विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आला. हा सर्व कचरा थेट राजाराम बंधार्यात साचला. काही ठिकाणी कचर्याचा थर सुमारे दोन फूट जाड होता. कचर्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घटल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने बंधार्यात अडकलेला कचरा काढण्याचे काम हाती घेतले. जेसीबीच्या साहाय्याने कचरा काढण्याचे काम सुरू असताना, अनेक दुचाकीस्वार धोकादायकरीत्या बंधार्यावरूनच मार्ग काढत होते.
पंचगंगा प्रदूषण कमी करण्याच्या सूचना न्यायालयाने देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आता झोपले आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पर्यावरण कार्यकर्ते बुरहान नायकवडी यांनी या परिस्थितीला नागरिक आणि प्रशासन दोघांनाही जबाबदार धरले. तर प्रा. डॉ. लक्ष्मण करपे यांनी जागोजागी प्लास्टिक बाटली नष्ट करण्याची यंत्रे उभी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुमारे 50 टनांहून अधिक कचर्याचा उठाव केला. दिवसभर हे काम सुरू होते. यात प्रामुख्याने थर्माकोल, प्लास्टिक, लाकडाचे ओंडके आणि इतर प्रकारचा कचरा होता. चार आयवा इतक्या मोठ्या प्रमाणात हे मटेरियल संकलित करण्यात आले. कचरा उचलण्यासाठी 1 जेसीबी, 1 ट्रॅक्टर, 1 डंपर आणि 9 कर्मचारी कामावर होते. याचबरोबर शहरातील सखल भागांतील गाळ व प्लास्टिक काढण्याचे कामही आरोग्य विभागाकडून सुरू होते. संपूर्ण मोहीम प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दुपारी एक तरुण जेसीबी मशिनच्या बाजूने दुचाकी पुढे नेत असताना तोल जाऊन तरुण गाडीसह नदीपात्रात कोसळला. मात्र, पाण्यात साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यामुळे आणि वाहून आलेल्या लाकडांमुळे तो बचावला. उपस्थितांनी जेसीबीच्या मदतीने त्याला आणि गाडीला बाहेर काढले. दरम्यान, मी तुमची पंचगंगा नदी... तुम्ही आई, देवी म्हणून मला पुजता, नमस्कार करता. मात्र, माझ्या उदरात तुम्ही सर्व कचरा टाकला आहे, हे बघून खूप दुःख झाले, अशा शब्दांत नदीनेच आपल्या व्यथा मांडल्याचे भावनिक संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले.