

मुरगूड : येथील एका शाळेतील मुख्याध्यापक सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कृष्णा ज्ञानू दाभोळे (रा मुरगूड, ता. कागल) याच्यावर अॅट्रॉसिटी व पोक्सो गुन्हा दाखल न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागणार्या चौघांविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ऋषिकेश धेंडे, (रा. संभाजीनगर, कोल्हापूर), तेजपाल युवराज कांबळे (वय 27, पुष्पनगर, ता. भुदरगड) व सौरभ दिनकर कांबळे (19, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) आणि प्रकाश शंकर यादव, (57, रा. पुष्पनगर, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. यातील तेजपाल, सौरभ व प्रकाश यांना अटक करण्यात आली.
फिर्यादी योगेश कृष्णात दाभोळे यांचे वडील कृष्णा हे सध्या कोल्हापूर सबजेलमध्ये आहेत. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवणेसाठी संशयितांनी वेळोवेळी मुरगूड नाका, दाभोळे याच्या मुरगूडच्या राहत्या घरी तसेच मडिलगे बु.(ता. भुदरगड) गावच्या फाट्याजवळ जीवे मारण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करत समक्ष तसेच फोनद्वारे रोख रक्कम 15 लाख मागणी करून ती खंडणी स्वरुपात घेतली होती. त्यानंतर प्रकरण कायमचे मिटवण्यासाठी आणखी 35 लाख रुपयांची मागणी केल्याची फिर्याद मुरगूड पोलिसांत दिली आहे. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 26 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी तेजपाल कांबळेकडून खंडणीच्या रकमेतील खरेदी केलेले 2 लाख 66 हजार रुपयांचे सोने हस्तगत केलेले आहे. मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे तपास करीत आहेत.