

कोल्हापूर : तीसपेक्षा जादा बोगस कंपन्यांद्वारे 50 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील जीएसटी गुप्तचर यंत्रणेने सोलापूर येथील वकील साजीद अहमद अब्दुल रौफ शेख (वय 46) याला गुरुवारी जेरबंद केले. घोटाळ्याची व्याप्ती शंभर कोटींच्या आसपास असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. न्यायालयाने साजीद शेख यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. सायंकाळी त्याची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.
कोल्हापूर विभागात बोगस कंपन्यांद्वारे झालेला कोट्यवधीचा घोटाळा चव्हाट्यावर आल्याने रॅकेटमध्ये सक्रिय असलेल्या कोल्हापूरसह सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील अनेकांचे धाबे दणाणले आहे. संशयित साजीद शेख याच्या प्राथमिक चौकशीत संशयितांची नावे चव्हाट्यावर आल्यानंतर कारवाईची व्याप्तीही वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुलकुमार जैस्वाल यांच्यासह विशेष पथकाने ही कारवाई केली.
‘डीजीजीआय’ कार्यालयाने मार्च, एप्रिलमध्ये साजीद शेख याच्यासह संबंधित बोगस कंपन्यांच्या कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी करून महत्त्वाच्या कागदपत्रांसह पुरावे हस्तगत केले होते. दीड महिना कागदपत्रांची छाननी सुरू होती. बोगस कंपन्यांद्वारे प्राथमिक चौकशीत 50 कोटींचा घोटाळा चव्हाट्यावर आल्याने साजीद शेख यास चौकशीसाठी समन्स बजावले. दुपारी कार्यालयात दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. शेख याने बोगस रॅकेट चालविल्याचे उघडकीला आले होते. बनावट जीएसटी पावत्या करून दरमहा कोट्यवधीची उलाढाल करीत होता, असेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
सोलापूर येथील विविध कार्यालयांवरील छापेमारीत पथकाने संगणक डेटा, मोबाईलसह कागदपत्रांच्या अनेक महत्त्वाच्या फाईल्सही हस्तगत केल्या आहेत. ‘डीजीजीआय’ने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. यासाठी फॉरेन्सिक यंत्रणांचीही मदत घेण्यात येत आहे. पथकाने सोलापूर येथे एकाच दिवशी 12 कंपन्यांच्या कार्यालयांची झाडाझडती घेतली. 30 कंपन्यांचा तपास शंभर कोटींपर्यंत जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.