आज उभारणार खरेदीची गुढी! सोने दरात १,५०० रुपयांची घट | पुढारी

आज उभारणार खरेदीची गुढी! सोने दरात १,५०० रुपयांची घट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याचा सर्वत्र अपूर्व उत्साह असून, उत्सवाचे जल्लोषी वातावरण आहे. नववर्षाच्या प्रारंभीच अनेक नवनव्या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह आहे. वाहने, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. खरेदीसाठी अनेक कंपन्या व विक्रेत्यांनी आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण-तरुणींनी जय्यत तयारी केली असून, पारंपरिक पेहरावात निघणारी नववर्ष स्वागत मिरवणूक आकर्षण ठरणार आहे.

सोने दरात 1,500 रुपयांची घट

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तोळ्यामागे दीड हजार रुपयांची घट झाली आहे. सोमवारी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. मंगळवारी कोल्हापुरात सोन्याचा दर 58 हजार 600 (जीएसटी स्वतंत्र) होता. सोमवारी हाच दर 60 हजार 300 रुपयांपर्यंत (जीएसटी स्वतंत्र) पोहोचला होता.

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 60 हजार 300 रुपये आणि 55 हजार 300 रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोन्याच्या दरातील घसरणीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर सातत्याने बदलत असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेशकुमार राठोड यांनी सांगितले.

Back to top button