पन्हाळगडावर चित्रपट शुटींगवेळी अपघात! सज्जा कोठी तटबंदीवरुन पडून तरुण गंभीर | पुढारी

पन्हाळगडावर चित्रपट शुटींगवेळी अपघात! सज्जा कोठी तटबंदीवरुन पडून तरुण गंभीर

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथील सज्जा कोठी जवळील तट बंदीवरून १९ वर्षाचा तरुण १०० फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुण अत्यवस्थ असून त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बाबत घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहिती अशी की पन्हाळा येथे गेले काही दिवसा पासून महेश मांजरेकर यांच्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. आज रात्री साडे आठ वाजता सज्जा कोठी परिसरात चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरण साठी घोडे आणले आहेत. या घोड्याची देखभाल करण्यासाठी आलेला नागेश खोबरे (वय १९, सोलापूर) हा तरुण सज्जा कोठीच्या उत्तर बाजूच्या तट बंदीवर मोबाईल फोन वरून बोलत होता मोबाईल वरील संभाषण संपवून उठताना त्याचा तोल गेला. त्यामुळे तट बंदीवरून नागेश शंभर फूट खाली कोसळला.

तटावरून खाली पडल्याचे तेथे उपस्थित लोकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने घटना स्थळावरून खाली दोर सोडण्यात आले व एक जण उतरला व अन्य दोघे देखील खाली उतरले. त्यानंतर जखमी नागेशला उचलून पन्हाळगडावर आणण्यात आले. नागेशच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली असल्याने तातडीने कोल्हापूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अत्यवस्थ असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. चित्रीकरणासाठी आणलेल्या घोड्याच्या देखभालीसाठी हा तरुण होता असे सांगितले जाते. पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र सदर घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. तसेच या जखमी तरुणास उचलून आणत असताना मोबाईल वरून चित्रीकरण करणाऱ्या तरुणास देखील दम दिला असल्याचे समजते.

Back to top button