चंदगड : नागरदळेमध्ये अज्ञातांकडून तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला | पुढारी

चंदगड : नागरदळेमध्ये अज्ञातांकडून तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : नागरदळे (ता.चंदगड) येथील चंद्रकांत रामू हदगल ( वय ५०) यांच्यावर तीन अज्ञात तरुणांकडूनकडून हल्ला झाल्याची घटना घडली. बुधवारी (दि. १५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागरदळे येथे चंद्रकांत यांच्या घरासमोरच घटना घडली. या घटनेने कोवाड पंचक्रोशीत एक वेगळ्या विषयाची चर्चा रंगली.

चंद्रकांत हदगल हे बुधवारी दुपारी शेताकडून घरी जात असताना घराजवळील दुर्गाडी रस्तावर काही अज्ञात तरुणांनी धारधार शस्त्राने चार-पाच सपासप वार केले. पहिला वार कानावर झाला त्यामुळेच कान फाटला आणि तीन वार पोटावर झाले. याचवेळी गावातील एकजण घटनास्थळी दाखल झाल्याने हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेतही ते एकाच्या दुचाकीवरून घरी आणण्यात आले. त्यानंतर लागलीच त्यांना उपचारासाठी बेळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता.

तोंडाला स्कार्प बांधलेली ‘ती’ महिला कोण?

घटना घडण्याआधी अर्धा तास एक महिला तोंडाला स्कार्प बांधलेली अंदाजे ४५ वयोगटातील महिला रस्त्यावर उभी असल्याचे काहींनी पाहिले होते. घटना घडल्यानंतर मात्र ती महिला गायब झाली. या प्रकरणात या अज्ञात महिलेचा सहभाग असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Back to top button