

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे पात्र तब्बल दिवसानंतरही कोरडेच पडले आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके वाळू लागले आहेत, तसेच दैनंदिन गरजेच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावे लागत आहे. त्यामुळे इचलकरंजीला दूध गंगेतून पाणी द्या म्हणणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी दूध गंगेचे कोरडे पडलेले हे विदारक चित्र पहावे असे या भागातील नागरिकांतून मत व्यक्त होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात ही दूध गंगा नदीचे पात्र पंधरा दिवस कोरडे पडले होते. त्यानंतर पाणी आले व आठ ते दहा दिवसातच नदी पुन्हा कोरडी पडली. दूधगंगा नदी धरणातून पाणी सोडल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी धरणापासून ते शेवटपर्यंत कशा पद्धतीने पाणी जाते याची पाहणी करणे गरजेचे आहे. याचे कारण ठीक ठिकाणी अनेक गावात असलेल्या लहान लहान बंधाऱ्यात पाणी अडवले जाते व ते ओवर फ्लो झाल्यावरच दुसऱ्या गावात पाणी जाते अशीच परिस्थिती सगळीकडे होत आहे त्यामुळे दत्तवाड सारख्या अखेरच्या काही गावात फार कमी प्रमाणात पाणी पोहोचते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज फार वाढली आहे. त्यामुळे येणारे पाणी लगेच उचल होते यासाठी पाटबंधारे खात्यांनी जे ठीक ठिकाणी पाणी अडवले जाते ते पाणी न अडवता प्रवाहित केले पाहिजे व दूध गंगा नदीवरील शेवटचे गाव दत्तवाड येथे हे सोडले जाणारे पाणी अडवले पाहिजे जेणेकरून नदी पात्रात पाणी आधी कालावधीसाठी साठवले जाईल.
दूधगंगा नदीचे पात्र दरवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत वारंवार कोरडे पडते, त्यामुळे दूधगंगेतून इचलकरंजीला पाणी दिले तर या कालावधीत पाणी कसे उपलब्ध होणार? या सर्व बाबींचा विचार इचलकरंजीला पाणी द्या म्हणणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी करावा. दूधगंगेचे पात्र वारंवार कोरडे पडत असल्याने पाण्यासाठी नागरिकांचे फारच हाल होत आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसात तब्बल ६० ते ७० नागरिकांनी आपापल्या घरी बोअर मारले आहेत.