कृष्णाकाठ मृत माशांमुळे भयाण अवस्थेत | पुढारी

कृष्णाकाठ मृत माशांमुळे भयाण अवस्थेत

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : संतोष बामणे गुरुवारी रात्री कृष्णा नदीत रासायनिक युक्त मळीचे सांडपाणी सोडल्याने हरिपूर-कोथळी येथील कृष्णा-वारणा नदीसंगमापासून ते उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पुलापर्यंत लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शुक्रवारी दिवसभरात या परिसरातील नागरिकांनी मासे गोळा केले होते; मात्र आता उर्वरित मृत माशाचा उदगावच्या कृष्णा काठावर खच पडला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. परिणामी या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षामुळे आता कृष्णा नदी ही प्रदूषित होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या 8 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने कोयना धरणातून पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी हळूहळू नदी पात्रात दाखल होत होते. यावेळी शुक्रवारी पहाटे कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी उदगाव परिसरात दाखल होत असतानाच सांगलीच्या शेरी नाल्यातून रासायनिक युक्त मळीचे सांडपाणी सोडल्याने कृष्णा नदीत प्रचंड प्रदूषण झाले. शिवाय नदीतील लहान ते मोठ्या अशा लाखो माशांचा मृत्यू झाला.

परिणामी शनिवारी हरिपूर येथील कृष्णा वारणा नदीच्या संगमापासून कोथळी, उमळवाड, उदगांव, अंकली, चिंचवाड, धामणी, बामणी, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, ढवळी, म्हैसाळ, कनवाड येथील बंधार्यापर्यत असलेल्या नदीकाठाला प्रंचड प्रमाणात मृत मासे येऊन लागल्याने कृष्णा काठावर प्रंचड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदीकाठ भयान झाला आहे. दुसरीकडे 20 ते 25 गावांच्या नळपाणीपुरवठ्यावर या दूषित पाण्याचा परीणाम झाला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पाणी उकळून किंवा शुद्ध पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान नदी प्रदूषण करणार्‍या घटकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.

सांगली येथील वसंतदादा साखर कारखान्याचे रसायनयुक्त पाणी व शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळल्याने हरिपूर ते उदगांव दरम्यान मोठ्या प्रमाणात मासे मृत पावले आहेत. त्यामुळे सांगली महापालिका व वसंतदादा साखर कारखान्याला नोटिसा दिल्या असून लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे.
– नवनाथ औताडे, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Back to top button