संजय राऊत यांना ‘सरोगेट बेबी’ म्हणायचं का? : राजेश क्षीरसागर यांचा घणाघात | पुढारी

संजय राऊत यांना 'सरोगेट बेबी' म्हणायचं का? : राजेश क्षीरसागर यांचा घणाघात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून, शिवसेना संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेले खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची व्यक्तव्ये पाहता उरला सुरला गटही संपण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचे, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि राज्याच्या विकासाचे काम होत असताना लोकशाहीच्या या मंदिराला चोर संबोधणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीचा अवमान केला असून, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. जर ते निवडून आलेल्या ४० आमदारांना टेस्ट ट्यूब बेबी असे संबोधणार असतील तर त्याच आमदारांच्या जीवावर निवडून खासदार झालेले संजय राऊत यांना सरोगेट बेबी म्हणायचे काय? अशी खोचक टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

शिवसेना जिल्हा व शहरच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे हाणत काळे फासले. यावेळी संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुखांच्या काळात शिवसेना एकसंघ होती. परंतु, नंतरच्या काळात शिवसेनेच्या नेतृत्वाला संजय राऊत सारख्या काही वाचाळविरांनी घेरल आणि अनेक लोकप्रतिनिधींची गळचेपी करण्याची मालिका सुरु झाली. ज्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी लढण्यात शिवसैनिकांनी उभं आयुष्य वेचल त्याच पक्षाशी युती करण्याचे दुर्भाग्य शिवसैनिकांच्या माथी आले. हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असणाऱ्या चौकडीमुळे झाले. शिवसेना पक्ष कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याच पाप खासदार संजय राऊत यांनी केले आणि खऱ्या अर्थाने शिवसेना संपविण्याचा विडा उचलला गेला. मात्र शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकानी उठाव केला आणि कॉंग्रेस -राष्ट्रवादी कडे गहाण ठेवलेला शिवसेना पक्ष मुक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, स्वत: खासदार असलेले संजय राऊत अशा पद्धतीने विधिमंडळाचा अवमान करतात. ही लोकशाहीवर टीका करणारी निंदनीय घटना आहे. संजय राऊत विधीमंडळाचा मान ठेवू शकत नसतील आणि विधानसभा सदस्यांचा अवमान करत असतील तर त्यांनी लाज बाळगावी कारण याच विधिमंडळ आणि विधानसभा सदस्यांच्या जीवावर ते खासदार म्हणून मिरवीत आहेत. या कर्तुत्वाला ऐहसान फरामोश अशी उपमा योग्य ठरेल. साडेचार-पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीना ते टेस्ट ट्यूब बेबीची उपमा देत असतील तर त्याच विधान सभा सदस्यांच्या जीवावर निवडून खासदार झालेल्या संजय राउत यांना सरोगेट बेबी म्हणायचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत झालेल्या बदलांवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशा दिग्गजांनी शिवसेना सोडली याचे कारण त्यांच्याभोवती असलेली चौकडी आहे. त्यांनी नेतृत्वावर केलेल्या जादूटोण्यामुळेच उरला-सुरला गटही संपण्याच्या मार्गावर उभा आहे.

खासदार संजय राऊत यांच्या सद्याच्या वक्तव्यांना महाराष्ट्र राज्यातील जनता आणि शिवसैनिक कंटाळले आहेत. गतवर्षी त्यांचा झालेला कोल्हापूर जिल्हा दौरा आणि गेले दोन दिवस सुरु असलेला दौरा यातून फरक जाणवून येतो. तीन- पाच लोकांचा गट घेवून त्यांना जाहीर सभेऐवजी सभागृहात मेळावा घ्यावा लागला. यातून त्यांच्या शक्तीप्रदर्शनाची कीव येते. आगामी काळात खासदार संजय राऊत यांनी आपली वाचाळविरतेला लगाम घालावा, असा सल्ला देखील राजेश क्षीरसागर यांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुक उदय भोसले, तुकाराम साळोखे, प्रा. शिवाजी पाटील, किशोर घाटगे, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश मोरे, जिल्हा समन्वयक विक्रम पोवार, रिक्षा सेना दक्षिण शहरप्रमुख राजू पवार, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button