Pranav Bhopale: वडणगेतील प्रणवचा फुटबॉल फ्रीस्टाईलमध्ये तिसरा विश्वविक्रम | पुढारी

Pranav Bhopale: वडणगेतील प्रणवचा फुटबॉल फ्रीस्टाईलमध्ये तिसरा विश्वविक्रम

वडणगे : पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर) येथील प्रणव भोपळे (Pranav Bhopale) या फुटबॉल खेळाडूने एका मिनिटामध्ये 134 वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून त्याच्या नावावर हा तिसरा जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले. यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुल हसन फैसल याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने एका मिनिटामध्ये 134 वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवला होता. प्रणवने एका मिनिटामध्ये 146 वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवून हा विक्रम आपल्या नावावर कोरला.

प्रणवने (Pranav Bhopale) यापूर्वी १५ ऑगस्ट २०२० रोजी गुडघ्यावर फुटबॉल ठेवून उभे राहण्याचा विक्रम केला आहे. बांगला देशातील कोणक कर्मा या खेळाडूचा 4 मिनिटे 6 सेकंदाचा विक्रम मोडून, प्रणवने 4 मिनिटे 27 सेकंद एवढी वेळ गाठून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याचबरोबर कपाळ ते नाकावरून एका मिनिटात 81 वेळा फुटबॉल फिरविण्याचा विक्रमही प्रणवने केला आहे.

लहानपणापासून फुटबॉलची आवड जोपासत या खेळातच काहीतरी नवीन आणि जगावेगळं करण्याचा प्रणवने चंग बांधला होता. शाळेत फुटबॉल खेळत तो वडणगे फुटबॉल क्लब या आपल्या घरच्या संघासोबत फुटबॉलचा सराव करीत होता. याचवेळी तो फुटबॉलमधील एक प्रकार फ्रीस्टाईलकडे वळला. फ्रीस्टाईल प्रकारात तो गेली चार वर्षे सराव करीत आहे. फ्रीस्टाईलमध्ये प्रणवने पहिला प्रयत्न केला, तो म्हणजे हाताच्या बोटावर बॉल फिरवणे, आणि यात तो यशस्वीही झाला. हाताच्या बोटावर तो तब्बल १ तास २६ मिनिटे बॉल फिरवतो. गिनीज विश्व विक्रमासाठी त्याने प्रयत्न केला. मात्र, गिनीजने त्याचा हा विक्रम नाकारला; पण नाउमेद न होता प्रणवने आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले व गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे तीन विक्रम आपल्या नावावर केले.

हातावरून छातीवर फुटबॉल फिरवण्याच्या रेकॉर्डचे प्रात्यक्षिक त्याने 25 डिसेंबर 2022 रोजी दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार त्याने प्रात्यक्षिक केले. यावेळी साक्षीदार म्हणून क्रीडा शिक्षक रविंद्र पाटील व टाईमकिपर म्हणून वडणगे फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक अशोक चौगले यांनी काम पाहिले.

प्रणवला या यशासाठी आई प्रतिभा भोपळे, वडील अशोक भोपळे, मोठा भाऊ अजिंक्य भोपळे, मामा सुधीर चिकोडे, तसेच वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रविराज मोरे, प्रविण जाधव, सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील, रगेडियन जिमचे फिटनेस कोच विनायक सुतार, अभिजित पाटील, ऋषिकेश ठमके यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा 

Back to top button