कोल्हापूर: रुकडीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण ठार, २ जण जखमी
रुकडी; पुढारी वृत्तसेवा : रूकडी – इचलकरंजी रोडवर महादेव मंदिरानजीक दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. विशाल संजय चव्हाण (वय २८, रा. माणगाव, ता. हातकणंगले) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रवीण भोसले व रोहन जाधव (रा. रुकडी) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.१८) झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुकडी गावातील प्रवीण भोसले व रोहन जाधव हे दोन तरूण मोटरसायकल (एमएच ०९ बी डब्ल्यू ७४९६) वरून इचलकरंजीच्या दिशेने जात होते. तर (एमएच ०९ डीटी ६९१८) या दुचाकीवरून विशाल चव्हाण (रा. माणगाव ता. हातकणंगले) हा रुकडीच्या दिशेने ट्रॅक सोडून भरधाव येत होता. यावेळी महादेव मंदिरानजीक या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात विशाल संजय चव्हाण (वय २८, रा. माणगाव, ता. हातकणंगले) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रवीण भोसले व रोहन जाधव (रा. रुकडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
अपघात ठिकाणी रुकडीचे माजी उपसरपंच शितल खोत व बबलू मकानदार यांनी धाव घेवून १०८ नं च्या रुग्ण वाहिकेला फोन करून जखमींना दवाखान्यात पोहोचवण्यास मदत केली. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.
हेही वाचा