

कोल्हापूर : जिल्ह्यातील आणखी 46 हजार 594 नागरिकांना रेशनवरील मोफत धान्य मिळणार आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातर्गंत पात्र लाभार्थ्यांसाठी मंगळवारी इष्टाकांत वाढ केली. त्यानूसार राज्यातील आणखी 5 लाख 96 हजार 765 नागरिकांना मोफत धान्य मिळणार आहे.राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नूसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतर्गंत पात्र लाभार्थ्यांना रेशनवरील धान्य दिले जाते. कोरोना कालावधीनंतर रेशनवरील धान्य मोफत वाटप केले जात आहे. विवाह तसेच जन्मामुळे कुटूंबातील सदस्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्या सदस्यांना हे धान्य मिळत नाही. काही ठिकाणी पूर्वीपासूनच या योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणारेही कार्डधारक आहे. या सर्वांचीच रेशनवरील धान्य मिळावे यासाठी सातत्याने मागणी आहे. अधिकाधिक नागरिकांना धान्य उपलब्ध करून द्यावे, याकरीता इष्टांक वाढवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडूनही करण्यात येत होती.
यासर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुधारीत इष्टांक जाहीर केला. यापूर्वी 26 जून 2024 मध्ये जाहीर केलेला इष्टांक रद्द करत, जादा 5 लाख 96 हजार 765 नागरिकांचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार जिल्ह्यातही आणखी 46 हजार 594 लोकांना आता मोफत धान्य मिळणार आहे.
जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 46 हजार 596 इतक्या जादा इष्टाकांचे लवकरच कोल्हापूर व इचलकरंजी शहर आणि तालुकानिहाय वाटप केले जाईल. त्यानंतर रेशन धान्य दुकाननिहाय त्याचे वाटप होईल. यानंतर धान्य मागणीसाठी दाखल केलेल्या अर्जांचा विचार करून, पात्रता पूर्ण करणार्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.
जून 2024 च्या इष्टांकानूसार राज्यातील 25 लाख 5 हजार 300 अंत्योदय कार्डधारक नागरिकांना या योजनेतर्गंत धान्य मिळत होते, सुधारीत इष्टाकांत ही संख्या कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील इष्टांक कमी जास्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी अंतोदय कार्डधारक 52 हजार 120 जणांना धान्य दिले जात होते, नव्या इष्टांकानूसार ते आता 52 हजार 337 जणांना मिळणार आहे.
सुधारीत इष्टांकामुळे जिल्ह्यातील 23 लाख 95 हजार 892 जणांना धान्य मिळणार आहे. यामध्ये अंत्योदय योजनेतील 52 हजार 337 तर प्राधान्य कुटूंब योजनेतील 23 लाख 43 हजार 555 जणांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 23 लाख 49 हजार 81 जणांना धान्य मिळत होते. त्यापैकी अंत्योदय योजनेतील 52 हजार 120 तर प्राधान्य कुटूंब योजनेतील 22 लाख 96 हजार 961 जणांना धान्य मिळत आहे.