कोल्हापूर : श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी महासत्संग; दीड लाख लोक येणार | पुढारी

कोल्हापूर : श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी महासत्संग; दीड लाख लोक येणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांत त्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे महासत्संग व महालक्ष्मी होम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी दीड लाखांहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वामी प्रणवानंद, ऋषी देवव्रत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने या कार्यक्रमाची तपोवन मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. श्री श्री रविशंकर १३ वर्षांनंतर कोल्हापुरात येत आहेत. ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वा. त्यांचे कोल्हापुरात आगमन होईल. तपोवन मैदान येथे सायंकाळी ६.३० वा. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महासत्संग कार्यक्रम होणार आहे. यासाठी बंगळूर आश्रम स्थित वेद विज्ञान महाविद्यापीठातील प्रशिक्षित वैदिक पंडित येणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा. महालक्ष्मी होम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महासत्संगासाठी भव्य स्टेज उभारला आहे. ३०० फुटांचा रॅम्प तयार केले आहे. कार्यक्रमस्थळी १८ फूट उंच शिवलिंग व कोपेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

ठिकठिकाणी १२ एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तपोवन मैदानासह कळंबा जेल परिसर, साळोखेनगर, निर्माण चौक, शासकीय आयटीआय, कलानिकेतन आदी १८ ठिकाणी दुचाकी व चारचाकी ६० हजार वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे. पार्किंगसाठी आठ प्रवेशद्वार असतील. शिवाय १ हजारांहून अधिक ज्येष्ठनागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेगावांहून येणाऱ्या लोकांची मंगल कार्यालये, लॉज, नागरिकांच्या घरी राहण्याची सोय केली आहे.

सरपंच, लोकप्रतिनिधींची परिषद

शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृह येथे सरपंच परिषदेचे आयोजन केले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १०२३ तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ४०० सरपंच उपस्थित राहणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर आदर्श राज्य कारभार, आदर्श ग्रामनिर्मिती व गावांचा शाश्वत विकास, नैसर्गिक शेती, पाणलोट क्षेत्र विकास, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, महिला सशक्तीकरण यासंदर्भात सरपंच व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत…

श्री श्री रवीशंकर यांचा नियोजित कार्यक्रम

श्री श्री रवीशंकर यांच्या उपस्थितीत १ फेब्रुवारी रोजी ६.३० वा. नांदेड महासत्संग सोहळा होईल. २ फेब्रुवारीस सकाळी ९ वा. ते गुरुद्वार येथे भेट देतील. त्यानंतर वाटूर – जलतारा येथे सकाळी ११.३० वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जलतारा प्रकल्पास भेट देणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वा. पुणे येथे महासत्संग कार्यक्रम त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. युवक मेळावा होईल. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. पुणे येथील मरकळ आश्रम येथे रूद्रपूजेचे आयोजन करण्यात आले आहे…

हे वचलंत का? 

 

Back to top button