कोल्हापूर : मुदाळतिट्टा येथे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : मुदाळतिट्टा येथे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी मुदाळतिट्टा येथील कालवा पुलावरच बोरवडे -बिद्री परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे म्हणाले की, राधानगरी- निपाणी रोडवर उजव्या कालव्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम करताना पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करून बांधकाम खात्याने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, संबंधित विभागाने तशी काळजी घेतली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याला संबंधित कंपनी जबाबदार आहे. वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने करता येईल, पण पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी हजारो रुपये मशागत, बी-बियाणांवर खर्च केले आहेत, ते वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि लवकरात लवकर पाणी सोडावे, यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून व्यथा मांडणार आहे. लवकरच मुदाळतिट्टा या ठिकाणी मोठे जनआंदोलन उभा केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज फराकटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, पांडुरंग चौगले, आनंदा पाटील, दत्तात्रय पाटील, तुषार फराकटे, सातापा चव्हाण, बाळासाहेब फराकटे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button