

कोल्हापूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत चौथ्या फेरीला सुरुवात झाली. तिसर्या फेरीअखेर अद्याप जिल्ह्यात 42 हजार 86 जागा रिक्त राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यातून 53 हजार विद्यार्थी बसले, त्यामधील 52 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेच्या निकाल वेळेत लागल्यानंतरही अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू झाली नाही. सुरुवातीपासूनच अकरावीची प्रवेश प्रक्रिया गोंधळात अडकलेली पाहायला मिळत आहे. सर्व्हर डाऊन, वारंवार वेळापत्रकात बदलामुळे विद्यार्थी, पालक हैराण झाले होते. यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरावर अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अकरावीला तिसर्या फेरीअखेर कला 5 हजार 891, वाणिज्य 4 हजार 430 विज्ञान 13 हजार 583 असे मिळून 23 हजार 904 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. चौथ्या फेरीसाठी नावनोंदणी करण्याची मुदत संपली आहे. 1 ऑगस्ट रोजी चौथ्या फेरीच्या जागा पोर्टलवर जाहीर होणार आहेत. 2 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. 4 ऑगस्ट रोजी चौथ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. या फेरीमध्ये कमीच प्रवेश होतील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे मत आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच अकरावीच्या 60 टक्केहून अधिक प्रवेश जागा रिक्त राहतील, अशी भीती आहे.