कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. साडेसहा वर्षांनंतर महामंडळ निवडणुकीला सामोरे जात आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा महामंडळाच्या अंतर्गत राजकारणाचा पडदा उघडला असून कोण बाजी मारणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारिणी सभा, यानंतर महामंडळाची सर्वसाधारण सभा घ्या यासाठी मुख्य कार्यालयाला लावलेले टाळे, पोस्टरबाजीतून आपले प्रश्न मांडणे असे अनेक प्रकार गेल्या दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळात महामंडळाच्या सभासदांनी अनुभवले आहेत. यातून महामंडळाच्या हिताचे काय झाले, सभासद, निर्मात्यांचे किती प्रश्न सुटले हा वेगळा विषय आहे; पण ज्यांना विश्वासाने निवडून दिले त्याच संचालकांमधील आपापसातील वादामुळे सभासदांनाही आता नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.
कोणत्या हेतूने चित्रपट महामंडळाची स्थापना झाली आणि आता नेमके काय चालले आहे, असा प्रश्न सभासदांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. गेल्या पाच वर्षांतील लेखाजोखा सर्वसाधारण सभा न झाल्याने मध्यंतरी काही सभासदांनी तो पोस्टरबाजीच्या माध्यमातून मांडला. कोरोनामुळे महामंडळाच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या; पण त्यापूर्वी पूर्ण बहुमत असतानाही मेघराज भोसले यांच्या अध्यक्षपदावरील अविश्वास ठराव, त्यानंतर सुशांत शेलार यांची निवड, तसेच पुन्हा राजकारणाला कलाटणी मिळत भोसले यांची अध्यक्षपदावर वर्णी कायम लागली.
यापूर्वी काम केलेल्या भास्कर जाधव, कै. यशवंत भालकर, अजय सरपोतदार, विजय कोंडके, विजय पाटकर यांच्या काळातही सभासदांमधील वाद विकोपाला गेले. आरोप प्रत्यारोप झाले. एक सर्वसाधारण सभा झाली, त्यातही पदाधिकार्यांमधील वाद सभासदांनी पाहिले. कोल्हापूर विरुद्ध मुंबई वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जयप्रभा स्टुडिओप्रश्नी कोल्हापूरच्या कलाप्रेमींचा लढा सुरूच आहे. अशातच महामंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. नव्याने सभासद कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संचालक मंडळातील अंतर्गत वाद हे सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले आहेत, तरीही एकमेकांना बघून घेण्याची भाषा यापूर्वी कधीच झाली नव्हती. आता निवडणूक महामंडळाच्या जुन्या घटनेनुसार की नव्या घटनेनुसार घ्यायची, यावरही वाद सुरूच आहे. त्यातच नव्याने महामंडळावर प्रशासक नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाची निवडणूक नियमाप्रमाणे होणार की प्रशासक येणार, याकडे लक्ष लागून आहे.