कोल्हापूर : पार्किंगसाठी खासगी जागेची भीक मागण्याची वेळ का आली?
कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ लागल्याने त्यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने शहरातील खासगी जागांवर पार्किंगचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरीही मिळेल. परंतु, शहरातील पार्किंग व्यवस्थेचे वाटोळे करण्याचे काम कोणी केले, असा कोल्हापूर शहरातील जागरूक नागरिकांनी प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
कारण, महापालिकेचे प्रशासन आज जरी हतबल होऊन पार्किंगसाठी उपाय शोधत असले, तरी शहरातील नव्या इमारतींमध्ये पार्किंगच्या बदल्यात गाळे, अव्यवहार्य भुयारी पार्किंग असे उद्योग करून महापालिकेच्याच व्यवस्थेने गेल्या काही वर्षांत मलिदा खाण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या सूत्रधारांना शोधून त्यांना गजाआड केले जात नाही, तोपर्यंत नगररचना विभागावर वचकही बसणार नाही आणि वाहतुकीची कोंडी फुटणेही अशक्य आहे.
कोल्हापूर शहराच्या हद्दीला वाहतुकीच्या कोंडीचा झालेला हा संसर्ग काही एक-दोन वर्षांचा नाही. गेल्या दोन दशकांपासून या संसर्गाला सुरुवात झाली होती. आता हा संसर्ग फोफावला आहे.
शहराच्या विस्ताराने उचल खाल्ल्याने उपनगरांमध्ये जमिनींच्या हिरव्या पट्ट्याचे रहिवासी विभागात रूपांतर झाले. शहरात जागोजागी मोठी संकुले उभी राहू लागली. महापालिकेच्या नगररचना विभागातील काही महाभागांनी पार्किंगच्या जागांत गाळे पाडण्यास मंजुरी देण्याचे उद्योग केले. यामध्ये काहींनी बक्कळ माया जमविली आहे. हजारात पगार मिळविणारे कोट्यधीश झाले आणि शहराच्या नियोजनाचे वाटोळे झाले.
नगरनियोजनाचे तीनतेरा करून स्वतःच्या तुंबड्या भरणारी एक सोनेरी टोळी नगररचना विभागात कार्यरत होती. या टोळीने लक्ष्मी दर्शनापायी पार्किंगचा बट्ट्याबोळ केला. केवळ पार्किंग नव्हे, तर उपनगरीय भागामध्ये लेआऊटला मंजुरी देताना अंतर्गत रस्त्यांसाठी 9 मीटरचे रस्ते बंधनकारक असताना त्यांची रुंदी 6 मीटरवर आणून उपलब्ध अतिरिक्त जागेतील प्लॉटचे ते वाटेकरी बनले. यामुळेच आज उपनगरांमध्ये अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे.
बांधकामावेळी पार्किंगचे बंधन ठेवणे आवश्यक होते. तेथे लगाम सैल सोडला गेला आणि ज्या जागा विकास आराखड्यात पार्किंगसाठी आरक्षित आहेत, त्यांचा बाजार करण्याचे काम या सोनेरी टोळीला हाताशी धरून कारभार्यांनी केले. व्हिनस कॉर्नरजवळ गाडी अड्ड्यात अतिक्रमण करणार्यांना हात लावण्याचे धाडस प्रशानाला होत नाही. मग, कोल्हापूरचा विकास कसा होणार, असा प्रश्न उभा राहतो.

