

कोल्हापूर : रंकाळा स्टँड परिसरात असलेल्या आयरेकर गल्लीतील एका घरात तब्बल 40 पेक्षा जास्त मांजरे पाळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. प्रदीप आणि माधुरी बुलबुले या दाम्पत्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
अखेर त्रस्त नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत मांजरांची सुटका केली. पथकाने तीन मांजरे ताब्यात घेतली, तर उर्वरित मांजरे पळून गेली. या कारवाईदरम्यान घरातून तब्बल दोन ट्रॉली भरून कचरा आणि टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बुलबुले दाम्पत्याने आपल्या घरात मोठ्या संख्येने मांजरे पाळली होती. या मांजरांमुळे घरात प्रचंड घाण आणि कचरा साचला होता. याचा उग्र वास परिसरातील घरांमध्ये पसरत असल्याने नागरिकांचे राहणे मुश्कील झाले होते. वारंवार सांगूनही फरक पडत नसल्याने अखेर रहिवाशांनी महापालिका आणि संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत कारवाईचा बडगा उगारला.
कारवाईसाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. घरात मांजरे पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका कर्मचार्याला मांजराने चावा घेतला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घराची अवस्था इतकी बिकट होती की, दार उघडताच दुर्गंधीचा प्रचंड भपकारा आला. घरात सर्वत्र अंधार पसरला होता आणि कचर्याचे ढीग साचले होते. स्वच्छतेसाठी गेलेल्या कर्मचार्यांना मास्क आणि रुमाल बांधूनही स्वच्छता करणे कठीण झाले. काहींना तर भडाभडून उलट्याही झाल्या.
ही कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त कृष्णा पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, नंदकुमार पाटील, सहायक निरीक्षक दिलीप पाटणकर, सुरज घुणकीकर आदी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे आयरेकर गल्लीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.