कोल्हापूर : कार- दुचाकीच्या धडकेत पिशवी येथील तरुण ठार, एक गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : कार- दुचाकीच्या धडकेत पिशवी येथील तरुण ठार, एक गंभीर जखमी

सरुड : पुढारी वृत्तसेवा : सरुड (ता.शाहूवाडी) गावच्या हद्दीतील बांबवडे रस्त्यावरील कडवी नदी पुलानजीक ओमणी कारला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. विघ्नेश आनंदा पाटील (वय १७, रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या अपघातात प्रतीक किसन सावंत (रा. शिरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. बांबवडे येथील खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (दि.२२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

बांबवडेच्या दिशेने निघालेल्या ओमणी कारला भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी ओमणी कारला धडकून हा अपघात झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. दरम्यान, बांबवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत विघ्नेश पाटील याचा मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठवून दिला. तसेच जखमी तरुणाला उपचारासाठी बांबवडे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. घटनेतील प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या जखमी तरुणाच्या जबाबानंतर अपघाताची वास्तव माहिती समोर येईल, हा जबाब नोंदविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांनी सांगितले.

अपघातात मयत झालेला विघ्नेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. सागाव (ता. शिराळा) येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये तो सध्या बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आई-वडील बांबवडे येथे अंबिरा परिसरात हातगाड्यावर चहा विकून कुटुंबाचा कसाबसा चरितार्थ चालवतात. उमद्या वयात मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने हे गरीब दाम्पत्य मनाने पुरते खचून गेले आहे. या घटनेमुळे पिशवी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button