Hasan Mushrif | राष्‍ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्‍यकडे ३,५६५ ठराव

अवसायनातील संस्‍था वगळल्‍या तरी काही साध्‍य होणार नाही
Hasan Mushrif |
Hasan Mushrif | राष्‍ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्‍यकडे ३,५६५ ठराव
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळच्‍या मतदार यादीतील ५,३८० दूध संस्‍थांपैकी ३,५६५ दूध संस्‍थांचे ठराव हे राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे आहेत. त्‍यामुळे जरी अवसायनातून पात्र ठरलेल्‍या ४९२ संस्‍था वगळल्‍या तरीही अदृश्‍य शक्‍ती गोकुळ निवडणुकीत काही साध्‍य करू शकणार नसल्‍याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्‍ये गेल्‍या ३० ते ३५ वर्षांत दूध वाढ कार्यक्रम, दूध संस्‍थांची नोंदणी झाली नाही. आमची सत्ता आल्‍यावर आम्‍ही ९ लाख लिटर दूध संकलन २० लाख लिटरपर्यंत नेले, संस्‍था वाढविल्‍या. मात्र, जेव्‍हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे ३० जून २०२२ ला युतीचे मुख्‍यमंत्री झाले तेव्‍हा सर्व यंत्रणा अदृश्‍य शक्‍तीच्‍या हातात होती. त्‍यांना कटऑफ डेटनुसार ३०८ दिवस मिळाले. मात्र, याकाळात त्‍यांनी दूध संस्‍था वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला नाही. संस्‍था नोंदणींसाठी त्‍यांचे हात बांधले होते का?

जागा वाटप ठराव संख्‍येनुसार

ठराव संख्‍येनुसारच जागा वाटप होईल. ५,३८० संस्‍थांमधून काँग्रेसच्‍या संस्‍था वगळल्‍या जातील. उर्वरित संस्‍था भागिले २५० असे जागा वाटपाचे सूत्रच मुश्रीफ यांनी मांडले. ठरावांची आकडेवारी पाहता एका पॅनेलला उमेदवार मिळण्‍याचे देखील मुश्‍कील होईल, असे ते म्हणाले.

‘त्‍या’ नेत्‍यांकडे ३०० ठराव

गोकुळ निवडणुकीत राधानगरी, शाहूवाडी तालुक्‍यांतील दोने नेते तटस्‍थ राहिले आहेत. त्‍यांच्‍याकडे ३०० ठराव आहेत. आमची ठराव संख्‍या पाहता ते पराभवाच्‍या दिशेने का जातील, असा प्रश्‍न मंत्री मुश्रीफ यांनी केला.

उर्वरित ठराव त्‍यांचे...

गोकुळच्‍या ५,३८० पैकी राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍यकडे ३,५६५ ठराव आहेत. राधानगरी, शाहूवाडीतील दोन नेत्‍यांकडे ३०० ठराव आहेत. राहिलेले ठराव त्‍यांचे आहेत, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी अप्रत्‍यक्षरीत्‍या सत्तेचे गणितच मांडले.

राष्‍ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्‍यचे अर्ज गुरुवारी

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यास मंगळवारपासून (दि. १५) सुरुवात होत आहे. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक कार्यालय केले असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली आहे. दरम्‍यान राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाकडून गुरुवारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

गोकुळ निवडणुकीच्‍या रणधुमाळीला उद्यापासून प्रत्‍यक्षात सुरुवात होणार आहे. रमणमळा येथे निवडणूक कार्यालय केले असून प्रक्रियेसाठी येथे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी असे एकूण ३५ अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. गोकुळ निवडणुकीत महायुतीत राष्‍ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्‍य शक्‍ती हे तीन पक्ष एकत्र आहेत. त्‍यांच्‍याकडून संपर्क दौरेही एकत्र सुरू आहेत. भाजप स्‍वतंत्रपणे संपर्क दौरे करत आहे. आता उमेदवारी अर्जही तिन्ही पक्ष एकत्र भरणार आहेत. यामध्‍ये भाजपचा समावेश दिसत नाही. एककीकडे महायुतीचे नेते गोकुळची निवडणूक महायुती म्‍हणून लढणार आणि जिंकणार असे ठामपणे सांगत आहेत. दुसरीकडे संपर्क दौरे, उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुती एकत्र दिसत नाही. त्‍यामुळे गोकुळ निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळातून उपस्‍थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news