कोल्हापुरात दुसर्‍या दिवशीही मुसळधार | पुढारी

कोल्हापुरात दुसर्‍या दिवशीही मुसळधार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर शहरात बुधवारी सायंकाळी ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. सायंकाळी 5.30 ते 6 या अवघ्या अर्ध्या तासात 32 मि.मी. पाऊस बरसला. जोर ओसरल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या पावसाने रस्त्यांची अक्षरशः तळी झाली. वाहतुकीचा बोजवारा उडाला. धुवाँधार पावसाने नागरिकांची दैना उडवली. सलग दुसर्‍या दिवशीही जनजीवन विस्कळीत झाले.

कोल्हापुरात सकाळी वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर कडकडीत ऊन पडले. हवेतील उष्मा वाढल्याने सायंकाळी पाऊस होईल, अशीच शक्यता होती. सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले. आकाश इतके काळेभोर झाले की, सव्वापाचच्या सुमारास शहरात अंधार पडला. पाठोपाठ साडेपाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला. अवघ्या काही मिनिटांतच पावसाचा जोर इतका वाढला की, पाच-दहा फुटांवरीलही काही दिसत नव्हते. पावसामुळे जागा मिळेल तिथे लोक दाटीवाटीने थांबले होते. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली.

सखल भाग जलमय

पाच-दहा मिनिटांतच रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. पाहता पाहता, सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवरून वाहणार्‍या पाण्यामुळे रस्त्यांनाच नाल्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी पायर्‍यांवरून, उतारावरून वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यांवरून वाहत आलेले पाणी दुकाने, घरांतही शिरले.

परीख पुलाखाली पाणी

दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक, जयंती नाला पूल, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी आदी ठिकाणी पाणी साचले होते. परीख पुलाखाली सुमारे फूटभर पाणी होते, त्यातूनच वाहनांची ये-जा सुरू होती. पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आवाराला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे कर्मचारी, नागरिकांनाही काही काळ बाहेर पडता आले नाही. स्टेशन रोड ते महावीर कॉलेज मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, केव्हिझ पार्क आदी ठिकाणीही रस्त्यांवर पाणी होते.
रस्त्यांवर साचलेले पाणी आणि धुवाँधार पाऊस, यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत होती. यामुळे शहरातील बहुतांशी सिग्नलवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बाजारपेठा ओस

पावसाने सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठांतील खरेदीवर पाणी फिरवले. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्याचेच टाळले. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत, दुकानांत अजिबात गर्दी नव्हती. फेरीवाल्यांचे मोठे हाल झाले. ग्राहक तर नाहीच, त्यात विक्रीसाठी लावलेल्या साहित्याचेही पावसाने नुकसान झाले. पावसाने केएमटी बसचेही वेळापत्रक कोलमडून गेले. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, व्हिनस कॉर्नर, शिवाजी चौक, लुगडी ओळ आदी बसथांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बसेस नव्हत्या. अनेक ठिकाणी रिक्षाही मिळत नव्हत्या. बाहेरगावाहून कोल्हापुरात आलेल्या नागरिकांचे पावसाने हाल झाले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मोठी धावपळ उडाली. पावसाने काही काळ दर्शनरांग ओस पडली होती.

सांगरूळ, बालिंगा, निगवे येथे दमदार पाऊस

करवीर तालुक्यात सरासरी 50 मि.मी. पाऊस झाला. बालिंगा, सांगरूळ, निगवे परिसरातही दमदार पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासांत 41 मि.मी.पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 23.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात 66.7 मि.मी. झाली. हातकणंगले तालुक्यात 46.7, शिरोळमध्ये 12.2, पन्हाळ्यात 47.3, शाहूवाडीत 38.8, राधानगरी 20.5, कागल 20.2,गडहिंग्लजमध्ये 8.4, भुदरगडमध्ये 15.8, आजर्‍यात 6.1, तर चंदगड तालुक्यात 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पंचगंगा पातळीत 3 फूट वाढ

जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी कडवी, चित्री व घटप्रभा ही तीन धरणे वगळता सर्वच धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरीतून 800 क्यूसेक, वारणेतून 600 क्यूसेक, तर दूधगंगा धरणातून 2 हजार 577 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि धरणांतील विसर्ग, यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली. मंगळवारी 10.8 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळी बुधवारी सकाळी आठ वाजता 13.10 फुटांवर गेली होती.

सांगाव परिसरात ढगफुटी

कसबा सांगाव : कागल पूर्व भागातील कसबा सांगाव, मौजे सांगाव परिसरात ढगफुटीसद़ृश पावसाने झोडपले. सुमारे दोन तास पडणार्‍या पावसाने इचलकरंजी-निढोरी राज्यमार्गाला ओढ्याचे स्वरूप आले होते.

केंबळी-बेलवळे परिसराला झोडपले

केंबळी : सलग दुसर्‍या दिवशी केंबळी-बेलवळे (ता. कागल) परिसराला पावसाने झोडपून काढले. कापणीस आलेले भात व सोयाबीन अतिवृष्टीने भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

आळते परिसरात घरात पाणी घुसले

आळते : आळतेसह लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, नरंदे आदी गावांना दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. त्यामुळे तलाव, नाले, गटारी भरून रस्त्यांवर पाणी आले. गावातील सर्व रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. काहींच्या घरांत मध्यरात्रीच पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यास सोयाबीन, भुईमूग शिवारातच कुजण्याची भीती आहे.शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोडोली परिसरात भाताचेे नुकसान

कोडोली : कोडोली परिसरात पावसाने हातातोंडाला आलेली भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात आडवी झाली आहेत. भुईमूग व सोयाबीनला तर मोड आले आहेत. हातातोंडाला आलेली पिके वाया जाणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल आहे.
भात, सोयाबीन काढणीत व्यत्यय

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात, सोयाबीन काढणीमध्ये व्यत्यय येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती आहे.

शित्तूर-वारुण परिसराला पावसाने झोडपले

शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण परिसराला सलग दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी (दि. 11) रात्री नऊच्या दरम्यान झाडाची फांदी पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.

पट्टणकोडोलीला रस्त्यावर पाणी

हुपरी : मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे हुपरी परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. हुपरी-कोल्हापूर मार्गावर पट्टणकोडोली येथे ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे पंचतारांकित वसाहती, गोकुळ शिरगावमार्गे वाहतूक वळवण्यात आली. माळभागातील बाजारातही नागरिक व विक्रेत्यांची धावपळ उडाली.

Back to top button