काेल्‍हापूर : कुरुंदवाडमध्‍ये मुलांच्या अपहरणाच्‍या अफवेमुळे गाेंधळ | पुढारी

काेल्‍हापूर : कुरुंदवाडमध्‍ये मुलांच्या अपहरणाच्‍या अफवेमुळे गाेंधळ

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : फुलाच्या दुकानात हार घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला पेढ्याचे दुकान दाखवण्यासाठी दुकानातील दोन लहान मुले गेली. त्यानंतर या दोन्ही मुलांचे अपहरण झाल्याच्‍या गैरसमजातून गोंधळ उडाला. कुटुंबातील महिलांची रडारड सुरू झाली. गर्दीचा महापूर झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले.  तपास यंत्रणा गतिमान झाली.अन…..काही क्षणातच बोलकी मुले ग्राहकासोबत हसत खेळत पेढा खात आपल्या फुलाच्या दुकानात परतली आणि कुटुंबियांना धीर आला. मात्र काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबियाबरोबरच पोलिसांचेही धाबे दणाणले होते.

 मुले गायब झाल्‍याने पसरली अफवा

कुरुंदवाड येथील नूरजहा फ्लॉवर मर्चंट येथे टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील चारचाकीतून दोन जण हार घेण्यासाठी आले होते. दुकानाचे मालक असिफ दबासे यांच्याकडे एकच हार शिल्लक होता. दुसरा हार तयार करून देतो थांबा, असे सांगत त्यांनी आपला 6 वर्षीय मुलगा कबीर दबासे व चार वर्षीय शादाफ दबासे या दोघांना दुकानात बसवून घरात हारासाठी फुले आणण्यास गेले. ते परत दुकानात आल्यानंतर दोन्ही मुले व चारचाकी व ग्राहक नव्हते. आपल्या मुलांचे अपहरण झाले म्हणून चारचाकी व मुलांची शोधा-शोध सुरू झाली. दबासे कुटुंबातील महिलांची रडारड सुरू झाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच गर्दी झाली. तपास यंत्रणा गतिमान झाली.

दोन्ही मुले पेढा खात गाडीतून खाली उतरली…

काहीवेळातच दोन मुले आणि चारचाकी दुकानजवळ आली. दोन्ही मुले पेढा खात गाडीतून खाली उतरली. अन् कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडत. त्या दोन ग्राहकांवर संतापले.  ग्राहकांनी सांगितले की, “आम्हाला पेढे हवे होते. या दोन मुलांना दुकानाचा पत्ता विचारला असता चारचाकीतून फिरायला मिळेल या हौसेने मुलांनी आम्ही दुकान दाखवतो म्हणून चारचाकीत बसले. प्रथमतः बाजार पेठेतील एका दुकानात मुले आम्हाला घेऊन गेले. मलई पेढे त्या दुकानात उपलब्ध नसल्याने दुकानदाराने नृसिहवाडीत मिळतील असे सांगितले. हार तयार होईपर्यंत मुलांना घेऊनच पालिका चौकातून नृसिहवाडीला जाऊन पेढे घेतले आणि परत आलो.  मुलांनाही पेढे खायला दिले”. ही हकीकत ऐकल्‍यानंतर कुटुंबीय शांत झाले. घडला प्रकार गैर-समजुतीतून झाल्याचे कुटुंबीय आणि त्या ग्राहकांनी सपोनि भांगे यांच्यासमोर कथन केले आणि या नाट्यमय घडामोडीवर पडदा पडला.

चार दिवसांपूर्वी दुर्वा माळी दुर्वा माने या दोन मुलीच्या साम्य नावावरून एका पालकाबद्दल गैरसमज निर्माण झाला होता. यानंतर आज पेढ्याचे दुकान दाखवण्यासाठी गेलेल्या मुलांचे अपहरण झाले या गैरसमजुतीतून अपहरण झाल्याच्या अफेचा दुसरा प्रकार घडला  शहरात याघटनांची उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Back to top button