पुढच्या वर्षी लवकर या... | पुढारी

पुढच्या वर्षी लवकर या...

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष… ढोल-ताशांचा गजर… फटाक्यांची आतषबाजी व अलोट गणेशभक्तांच्या साक्षीने भर पावसात सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला. इराणी खणीमध्ये शनिवारी दुपारपर्यंत विसर्जन सुरू होते. गणेशभक्तांच्या अलोट गर्दीने परिसर फुलला होता. इराणी खणीवर 32 तास विसर्जन चालले. एकूण 1081 गणेशमूर्तींचे विसर्जन येथे झाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियम शिथिल केले. सार्वजनिक गणेश तरुण मंडळ व घरगुती गणेशमूर्तींचे इराणी खणीमध्ये विसर्जन शुक्रवारी सकाळी सुरू झाले. महापालिकेने इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी केली होती. विसर्जनासाठी एकच मुख्य ठिकाण होते. प्रशासनाने मुख्य मार्गासह पर्यायी मार्ग गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठेवले होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजता पहिल्या मानाच्या गणपतीचे इराणी खणीमध्ये विसर्जन झाले. त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत गर्दी होती. चार वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र, विसर्जन मिरवणूक थोडा वेळ रेंगाळली. सायंकाळी पाचनंतर पाऊस थांबल्यावर पुन्हा गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू झाले. सहा वाजेपर्यंत लहान-मोठ्या सुमारे 530 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

कोल्हापूरसह परिसरातील गणेश तरुण मंडळे सायंकाळनंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडले. सायंकाळी सहानंतर संभाजीनगर पेट्रोल पंप ते इराणी खण व संध्यामठ ते इराणी खण मार्गावर गणेश विसर्जनासाठी पायी, चारचाकी, दुचाकी वाहनांसह नागरिकांची गर्दी झाली होती. विसर्जनासाठी आलेल्या भक्तांच्या स्वागताबरोबरच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महापालिका व पोलिस प्रशासन विसर्जनासाठी आलेल्या तरुण मंडळांना गणेशमूर्ती उतरवून ट्रॅक्टर पुढे नेण्याच्या सूचना देत होत्या. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह महापालिका, पोलिस अधिकारी विसर्जनस्थळी थांबून मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करीत होते.

सायंकाळी सातनंतर इराणी खण परिसर गर्दीने खचाखच भरले होता. विसर्जनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री दहा वाजता 687 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. शहरातील विविध ठिकाणांहून टॅम्पोमधून आणलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीमध्ये तराफाच्या साहायाने विसर्जन करण्यात आले. पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणूक संथगतीने सुरू होती. पहाटे चार वाजता 977 गणेशमूर्ती विसर्जन झाले. त्यानंतर सकाळी सहानंतर पुन्हा विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 1003 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. चार विभागीय कार्यालयांतर्गत 1273 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दुपारपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. दुपारी 12 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसातही गणेशमूर्ती विसर्जन सुरू होते. दुपारी 2 वाजता 1061 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. मिरवणुकीतील भगतसिंग तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेशमूर्तीची आरती करून सायंकाळी सव्वा पाच वाजता मूर्तीचे विसर्जन झाले. यावेळी इराणी खण येथे एकूण 1081 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

ताराबाई रोडवर हाणामारी

ताराबाई रोडवर मध्यरात्री दोन मंडळांच्?या कार्यकर्त्यांमध्?ये जोरदार हाणामारी झाली. यामध्?ये एका मंडळाचा डॉल्?बी फोडण्?यात आला. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. नंतर हे प्रकरण मिटविण्?यात आले.

टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक

मिरवणूक मार्गावर सकाळपासून सायंकाळपर्यंत महाद्वार रोडवर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. मिरवणुकीत बहुतांशी तालीम मंडळे पारंपरिक खेळाबरोबरच ढोल, ताशे, लेझीम पथकासह सहभागी झाले होते. महाडिक वसहातमधील श्रीकृष्?ण मित्र मंडळाने टाळ-मृदुंगांच्?या गजरात मिरवणूक काढली होती. या टाळ-मृदुंगांच्?या गजरात जिल्?हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे व मनपा आयुक्?त डॉ. कादंबरी बलकवडे तल्लीन झाले.

‘लेटेस्ट’चा शाहू चित्ररथ आकर्षण

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने शाहू जीवन कार्यावर आधारित रथ विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरला. 14 फूट बाय 40 फुटांच्या भव्य रथावर राजर्षींच्या जीवन कार्यावरील विविध प्रसंग उभारण्यात आले होते. याशिवाय स्वराज्य निर्माते शिवछत्रपती, स्वराज्य रक्षिका रणरागिणी ताराराणी व कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहूंच्या भव्य प्रतिमा सर्वात पुढे लक्षवेधी होत्या. 300 कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच धनगरी ढोल पथकाने लेटेस्टच्या मिरवणुकीचा बाज राखला. तत्पूर्वी लेटेस्टच्या मिरवणूकीचे उद्घाटन सकाळी शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक व्ही. बी. पाटील, उदय गायकवाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, अध्यक्ष गजानन यादव आदी उपस्थित होते.

शाहूपुरी युवक मंडळाचा शाहू चित्ररथ

शाहूपुरी युवक मंडळाचा शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू जीवनावर आधारित चित्ररथ आकर्षण ठरला. यात राजर्षी शाहूंची हत्तीवरून मिरवणूक हा प्रसंग साकारण्यात आला होता.

आजीबाईंची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

मिरवणुकीतील शिस्?तीबाबत एक आजीबाई चांगल्याच भडकल्या. त्यांनी तडक पोलिसांकडे धाव घेतली. मिरवणुकीस काही नियम आहेत का नाही? असा सवाल केला. पोलिसाने दखल न घेतल्याने त्या अधिक संतप्त होऊन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भेटलया. बलकवडे यांनी तक्रार करा, कारवाई करू, असे सांगितले.

मंडळाच्या पदाधिकार्‍यांना पान-सुपारी

मिरवणूक मार्गावर विविध राजकीय पक्ष, संस्थांनी गणेश मंडळांना पान-सुपारी देण्यासाठी बुथ उभारले होते. यात महापालिका प्रशासनासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आप, हिंदू एकता यांच्यासह इतरांचा समावेश होता. महापालिकेच्या बुथमध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे मंडळांच्या पदाधिकार्‍यांना पान-सुपारी देत होत्या. इतर बुथमध्ये त्या-त्या पक्षांचे पदाधिकार्‍यांच्या हस्ते पानसुपारी दिली जात होती.

नेत्यांना नृत्य करायला लावले

सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. त्या पाश्वर्र्भूमीवर बहुतांश मंडळांनी आपापल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाने ऑडिओ कॅसेट तयार करून घेतल्या होत्या. त्या कॅसेट महाद्वार रोडसह गर्दीच्या ठिकाणी आणि आपापल्या नेत्यांच्या बुथजवळ आल्यावर जोरदारपणे वाजविण्यात येत होत्या. त्यावर कार्यकर्ते बेधुंद होऊन थिरकत होते. काही उत्साही कार्यकर्ते चक्क नेत्यांना खांद्यावर उचलून डान्स करायला भाग पाडत होते.

आपण यांना शोधताय का ?

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाची मिरवणूक गर्दीच्?या महापुरात दुसर्‍या दिवशीअखेर मोठ्या जल्?लोषात निघाली. दरम्?यान रात्री 9 ते 12 दरम्यान मिरवणूक मार्गावर लहान मुले हरवण्याच्?या काही घटना घडल्?या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत या मार्गावर उभारण्यात आलेल्या स्?वागत कक्षावरून त्?याबाबतची घोषणा करून त्?या-त्?या संबंधित मुलांच्?या पालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत होते .

आबालवृद्धांचा जल्लोष

यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिला आणि मुलींनीही झांजपथक, ढोल, ताशा, लेझीम पथक, साऊंड सिस्टीमवर ठेका धरला होता. दिवसभर मिरवणूक मार्गावर हे चित्र दिसत होते. या सर्व वाद्यांच्या तालावर आबालवृद्धांची धमाल सुरू होती.

मूर्तीच्या पायी घेतली सुखाची झोप

गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्?येक मंडळांतील मोठमोठ्या गणेशमूर्तींच्?या चरणी चिमुकल्यांकडून चिरमुरे आणि फुलांची उधळण केली जात होती. रात्री डीजेचा साऊंड आणि लाईटचा इफेक्?ट यांच्?या धुंदीत नाचगाण्यांत त्?यांनीही ताल धरला. दरम्?यान सात-आठ तास उलटल्यानंतर दमलेल्या थकलेल्या बालचमूंनी मूर्तीच्?या पायावरच डोकं टेकून सुखाची झोप घेतली.

डान्स करणारी आज्जी व्हायरल

या मिरवणुकीत आबालवृद्धांनी सहभाग घेत जल्?लोष केला. साऊंड सिस्टीमवर वाजणार्‍या ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्?यावर कोल्हापुरातील आज्जीबाईने ठेका धरल्?याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्?हायरल झाला. राज्यपातळीवरील वृत्तवाहिन्यांनी या व्हिडीओची दखल घेतली.

आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांचा ठेका

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या स्वागत बुथवर थांबून माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. प्रा. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील यांनी गणेश विसर्जनासाठी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरावयास लावले. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

.. अखेर महिलांच्या पुढाकाराने गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन

इराणी खणीवर रात्री बारानंतर क्रशर चौक मित्र मंडळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. मात्र, डीजेच्या आवाजाची मर्यादा बारा वाजेपर्यंत असल्याने पोलिसांनी त्यांना डीजेचा आवाज बंद करायला लावला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फक्त दोन गाणी वाजवू द्या, आम्ही मिरवणूक पुढे घेऊन जातो, असा आग्रह धरला. परंतु पोलिसांनी नियम व कायद्याच्या पलीकडे जाता येत नसल्याचे कार्यकर्ते व महिलांची समजूत काढली. त्यानंतर थोड्यावेळाने महिलांनीच पुढाकार घेऊन विसर्जन मिरवणूक पुढे नेली.

महापालिका, पोलिसांचे विसर्जनासाठी नेटके नियोजन

सार्वजनिक तरुण मंडळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेसह पोलिस यंत्रणेने नेटके नियोजन केले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांना रांगा लागल्या नाहीत. पवडी विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांचे टीम कार्यरत होत्या. 150 पोलिस अधिकारी, कर्मचारी, 100 होमगार्ड, विसर्जनासाठी 5 क्रेन, 15 तराफे, डंपर, पाण्याचे टँकर, स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा सज्ज होती. महापालिकेचे अग्निमन दलाचे जवान इराणखण विसर्जनस्थळी साधनसामुग्रीसह, रुग्णवाहिका तत्पर होती.

खाऊ, बिस्कीट पाकिटांचे वाटप

निर्माल्य विलगीकरणारसाठी एकटी संस्थेच्या महिला सदस्य कार्यरत होत्या. तसेच रोटरॅक्ट क्लबच्या 100 तरुण सदस्या, 30 एनजीओ, खारीचा वाटा ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी बंदोबस्तासाठी आलेल्या महापालिका, पोलिस प्रशासन अधिकारी, कर्मचार्‍यांना खाऊ, बिस्कीट पाकिटांचे वाटप केले.

Back to top button