कोल्हापूर : 1500 कर्मचारी 32 तास रस्त्यावर

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर शहरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने नेटके नियोजन केले होते. त्यासाठी शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सायंकाळपर्यंत तब्बल 32 तास 1 हजार 500 कर्मचार्यांचा रस्त्यावर राबता होता. नेमून दिलेल्या जागेवरच थांबून अधिकारी-कर्मचारी ड्युटी पार पाडत होते. शनिवारी दुपारी शेवटच्या मूर्तीचे विसर्जन झाले आणि अधिकारी निवांत झाले. त्यानंतर मात्र तत्काळ स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
दरम्यान, पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन होऊ नये यासाठी घाट परिसर लोखंडी बॅरिकेड्स लावून अडविण्यात आला होता. या रस्त्यावर काहिली ठेवण्यात आल्या होत्या. त्यात सुमारे 300 हून जास्त मूर्तींचे विसर्जन केले. नंतर महापालिकेने त्या मूर्ती इराणी खणीत विसर्जित केल्या. विभागीय कार्यालय अंतर्गत ठेवण्लेल्या 25 कृत्रिम कुंडांमध्ये 1273 घरगुती गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या मूर्ती इराणी खण येथे विसर्जित करण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे व इतर विभागाचे 650 कर्मचारी, 90 टेम्पो 430 हमालासह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जेसीबी, 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम अशी व्यवस्था होती.
महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विसर्जन मार्गावर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. लाकडी व मजबूत बांबूचे, लोखंडी बॅरिकेड्स, वॉच टॉवर उभारले होते. लाईटची व्यवस्था केली होती. इराणी खण व तांबट कमान येथे 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विसर्जनस्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधन सामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 13 तराफे व 4 क्रेनची व 430 हमालांची व्यवस्था केली होती.
इराणी खण येथे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, सहायक संचालक नगर रचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, वर्कशॉप अधीक्षक चेतन शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे यांच्यासह सर्व अधिकारी विद्युत, पवडी व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अग्निशमन जवान उपस्थित होते.
मनपाकडून मंडळांचे आभार
161 मंडळांनी कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी तर 920 गणेशमूर्ती सार्वजनिक मंडळांनी स्वत: विसर्जित केल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या 1081 मूर्ती इराणी खण येथे पर्यावणपूरक विसर्जित केल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आभार मानले. विसर्जन मिरवणुकीसाठी रात्रं-दिवस कष्ट घेणारे महापालिकेचे सर्व अधिकारी, आरोग्य, सफाई, विद्युत कर्मचारी, वैद्यकीय पथक, बचत गट तसेच व्हाईट आर्मी, महाराष्ट्र फोर्स, जीवन ज्योत संघटना, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.