मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार माझ्यासाठी सुखद धक्का : डॉ. डी. टी. शिर्के | पुढारी

मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार माझ्यासाठी सुखद धक्का : डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.

मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाल १० सप्टेंबररोजी संपत आहे. कुलपती कार्यालयाकडून डॉ. शिर्के यांना शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी यासंबंधीचा आदेश प्राप्त झाला. शिर्के हे तब्बल ३५ वर्ष अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. संख्याशास्त्रज्ञ म्हणून जगभरातील संशोधकांमध्ये त्यांची ओळख आहे. डॉ. शिर्के यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठात प्रभारी कुलसचिव, प्रकुलगुरु या पदावर काम केले आहे. शिर्के हे हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील आहेत. शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.

कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न असेल. हा शिवाजी विद्यापीठातील सर्व घटकांचा सन्मान समजतो. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून शनिवारी (दि.१०) पदभार स्वीकारणार आहे.
– डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ

हेही वाचलंत का ? 

Back to top button