कोल्‍हापूर : नंग्या तलवारी नाचवत गुंडांची दहशत | पुढारी

कोल्‍हापूर : नंग्या तलवारी नाचवत गुंडांची दहशत

हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा येथील काही गावगुंडांनी वाटमारीच्या हेतूने मोटारसायकल अडवून दादागिरी केल्याचा जाब विचारल्याचा रागातून धरून हातकणंगले येथील शिवाजी चौक परिसरांत नंग्या तलवारी नाचवत दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली . त्यानंतर याचा जाब विचारण्यांसाठी शेकडोंचा जमाव संशयितांच्या घरांवर चाल करून गेला असता जमावांवरही दगडफेक केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यांसमोर गर्दी केली होती. मध्यरात्री नागरिकांनी पोलिसांना निवेदन देऊन या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुनील खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक रमेश खोत याच्यासह अन्य चौघांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी एक युवक लक्ष्मी औद्योगिक वसाहतीकडून गावात येत असता संशयितांनी त्याची मोटारसायकल अडवून दमदाटी केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांबरोबरही त्यांनी वाद घालत अरेरावी केली. दुपारी हा प्रकार समझोत्याने मिटला असतानाही त्यांनी रात्री उशिरा भर बाजारात नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच शेकडोंचा जमाव रात्री उशिरा शिवाजी चौक परिसरात जमा झाला. झाल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी निघालेल्या जमावावरही संशयितांनी दगडफेक केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तत्काळ परिसरात बंदोबस्त तैनात केला.

गावगुंडांच्या बंदोबस्ताची मागणी

गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक गावगुंड व त्यांच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. गावठी दारू, गांजाची विक्री, परप्रांतीयांची लूटमार, मोबाईल, पैसे चोरी, घरफोडी अशी अनेक गैरकृत्ये सुरू आहेत. त्यांच्याकडून अनेक वेळा महिलांच्याही छेडछाड केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही. रविवारी तर त्यांनी भरचौकातच नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button