कोल्‍हापूर : दोन हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल जेरबंद | पुढारी

कोल्‍हापूर : दोन हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल जेरबंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36, रा. हातकणंगले) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहात पकडले.

ऐन गणेशोत्सवात झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत व पथकाने हे कारवाई केली. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की हातकणंगले येथील व्यवसायाने मेकॅनिकल असलेल्या तक्रारदाराविरोध कर्नाटकातील धारवाड कोर्टात खटला दाखल आहे. कोर्ट कामकाजासाठी संबंधित तक्रारदार वारंवार अनुपस्थित राहत असल्याने धारवाड कोर्टाने त्यांना अटक वॉरंट काढले होते.

संबंधित आदेशाची हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी अटक वॉरंट प्रकरणात मदत मदत करू असे सांगून कचरे यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. संबंधित तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध पथकाकडे लेखी तक्रार केल्यानंतर आज सकाळी सापळा करण्यात आला. तक्रारदार व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेताना पथकाने कचरे यांना रंगेहात पकडले. हातकणंगले पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकारानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कचरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

Back to top button