

कोल्हापूर : राजीव गांधी प्राणीसंग्रहालय कात्रज पुणे येथील वन्यप्राणी चितळ व सांबर सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रात स्थलांतरीत करण्यात आली. यात चितळ नर 17 व मादी 13 असे एकूण 30 चितळ आणि सांबर नर 4 व मादी 6 असे एकूण 10 सांबर यांचा समावेश आहे. पुणे ते झोळंबीपर्यंत सुरक्षितरीत्या वाहतूक करून चितळ व सांबर यशस्वीपणे सह्याद्री व्याघ्र राखीव वनात स्थलांतरीत केली.
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या खाद्यामध्ये तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. वन्यप्राणी स्थलांतर करण्यासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट बावधन पुणे यांचे सहकार्य लाभले. या वन्यप्राणी स्थलांतरण उपक्रमास तुषार चव्हाण (क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव), स्नेहलता पाटील (उपसंचालक चांदोली वन्यजीव विभाग), संदेश पाटील (सहायक वनसंरक्षक, ढेबेवाडी) यांचे मार्गदर्शन लाभले. ही मोहीम किरण माने (वनक्षेत्रपाल ढेबेवाडी), काशिलिंग बादरे (वनपाल झोळंबी), बळवंत चक्रधर (वनरक्षक, झोळंबी) आणि वनसेवक यांनी यशस्वी पूर्ण केली.