कोल्हापूर : ‘मी सांगतो त्या उमेदवाराला मत द्यायचं’ इथंपर्यंतच्या चौकटी पार करत आजमितीला महिला मतदार राजकीय प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महिला मतदारांच्या वाढलेल्या टक्क्यावर थेट मुख्यमंत्री कोण होणार? याची गणिते आखली जात आहेत. राज्यात यंदा विधानसभेसाठी महिला मतदारांमध्ये सरासरी 3 टक्क्यांची वाढ, कुणाचे पारडे जड करणार आणि कुणाच्या हाती धुपाटणे देणार, हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘किंगमेकर’ ठरवण्यात महिलांच्या बोटावरची शाई महत्त्वाची ठरणार आहे.
यंदा विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख पक्षांमधील लढतीसोबत इतर पक्षांनीही आव्हाने उभी केली. त्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाळीने सत्तापटावरही परिणाम झाला. या घटनांचे पडसाद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमटले. दरम्यान, मतदारवाढीसाठी अनेक उपक्रमही राबवले जात होते. 20 नोव्हेंबरला राज्यातील मतदानाच्या आकडेवारीत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढल्याचे अधोरेखित झाले. महायुतीने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना आणि महाविकास आघाडीच्या वचननाम्यातील महालक्ष्मी योजना या घोषणांमुळेच महिलांचे मतदान वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात एकूण महिला मतदार - 4 कोटी 69 लाख 96 हजार
लोकसभा 2024 निवडणुकीतील महिला मतदार - 4 कोटी 22 लाख 79 हजार
विधानसभा 2024 निवडणुकीतील महिला मतदार - 4 कोटी 66 लाख
गेल्या 5 महिन्यांत वाढलेल्या महिला मतदार - 44 लाख
सर्वाधिक महिला मतदारांचे जिल्हे - रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग