कोल्हापूर : कारकुनाच्या टेबलवर ठेवली दहा हजारांची चिल्लर | पुढारी

कोल्हापूर : कारकुनाच्या टेबलवर ठेवली दहा हजारांची चिल्लर

कोल्हापूर; विकास कांबळे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील एका कारकुनाने पैशासाठी वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ केल्याने संबंधित ठेकेदाराने दहा हजारांची चिल्लर कारकुनाच्या टेबलवर ठेवण्याचा प्रकार कावळा नाका येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात घडला. या प्रकारामुळे ‘मजिप्रा’तील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे.

केमिकल पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणने निविदा मागविल्या होत्या. सर्वात कमी रकमेची निविदा मंजूर करण्यात आली. निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कारकुनाकडे वर्क ऑर्डर मागण्यासाठी गेला. यावेळी त्याला आमच्याकडे थोडे बघा असे सांकेतिक भाषेत सांगितले गेले. या ठेकेदाराने आपल्या परीने त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील कारकून खूश झाला नाही. आपण नव्याने काम घेतले आहे. त्यामुळे काम झाल्यानंतर बघू, अशी विनंती ठेकेदाराने केली. परंतु, कारकुनाने आपला हट्ट कायम ठेवला. या कारकुनाबद्दल कार्यालयात प्रचंड तक्रारी आहेत. परंतु, त्याचा वशिला मोठा असल्यामुळे तो अधिकार्‍यांनाही दाद देत नसल्याचे बोलले जाते.

2019 मध्ये संबंधित कारकुनाची पदोन्‍नती झाल्यामुळे त्याने सध्याच्या जागेवर येण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तत्कालीन अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍याचे गुण ओळखून त्याला हजर करून घेण्यास नकार दिल्याचे समजते. अधिकारी तेथून गेल्यानंतर मात्र या कारकुनाने सध्याच्या जागेवर आपली वर्णी लावून घेतली.

जोरदार वादावादी

ठेकेदाराने कारकुनाला हात जोडत वर्क ऑर्डर देण्याची विनंती केली. परंतु, कारकुनाने आपले काम केल्याशिवाय वर्क ऑर्डर देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे फेर्‍या मारून कंटाळलेल्या तरुणाने दहा हजारांची चिल्लर पिशवीतून आणून कारकुनाच्या टेबलवर ठेवली. यावेळी ठेकेदार आणि कारकून यांच्यात जोरात वादावादी झाल्यामुळे सर्व कर्मचारी जमा झाले.

Back to top button