कोल्हापूर : ‘गोकुळ’चे दूध उत्पादक ‘अमूल’चे आव्हान परतवून लावतील : आ. मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे दूध उत्पादक ‘अमूल’चे आव्हान परतवून लावतील : आ. मुश्रीफ

कागल; पुढारी वृत्तसेवा : गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. या संघासमोर असलेले अमूल दूधचे आव्हान गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादक शेतकरीच परतवून लावतील, असा विश्‍वास आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला.

आठवड्यापूर्वीच आमदार मुश्रीफ यांनी संघाच्या संचालक व कर्मचार्‍यांना दूध उत्पादनवाढीसाठी नवीन म्हशी खरेदी करण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन केले होते. आ. मुश्रीफ यांनी स्वतःच नवीन दोन म्हशी खरेदी करत या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून केली. आता आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी मुश्रीफांच्या गोठ्यात आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशींचे आ. मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच 850 एकर जमीन खरेदी केली आहे. तिथे ते म्हैस प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटिल डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभा करू शकत नाही. परंतु; त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैस दूध उत्पादनवाढ करावीच लागेल.

गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखांवर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकर्‍यांनी फक्‍त एक-एक म्हैस जरी खरेदी केली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. गोकुळ दूध संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी दूध उत्पादनवाढीसाठी प्रत्येकाने एक-एक म्हैस खरेदी केलीच पाहिजे. पुढच्या टप्प्यात 50 टक्के शेतकर्‍यांपर्यंत आपण ही मोहीम राबविली तर निश्‍चितच नव्याने 10 लाख लिटर दूध उत्पादन वाढेल. यंदा चांगला दूध दरफरक देण्याचा मानस चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेला आहे. या दूध उत्पादनवाढीच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहकार्य करावे. गोकुळ हा देशातील एक नंबर ब—ँड होण्यासाठी हातभार लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Back to top button