कोल्हापूर : धोकादायक इमारत उतरविली | पुढारी

कोल्हापूर : धोकादायक इमारत उतरविली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील दातार बोळ येथील मंदाकिनी शंकर लेले यांच्या इमारतीचा धोकादायक भाग महापालिकेच्या वतीने बुधवारी उतरविण्यात आला. इमारतीचा काही भाग पडल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मालक लेले व इतर मालकांना महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. ही इमारत गावठाणमधील व अरुंद रस्त्यावरील असल्याने धोकादायक भाग उतरवून घेण्यात आला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्र.2 मधील 10 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, सहा. अभियंता प्रमोद बराले, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी धोकादायक इमारतीचा भाग उतरवून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘त्या’ मनपा कर्मचार्‍याची चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर : कर्मचार्‍यांची आर्थिक पिळवणक करून खोटी नावे दाखवून निवडणुकीचे मानधन उचल करणारा महापालिका कर्मचारी गणेश दाविद आवळे याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्?हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना दिले. शिष्?टमंडळात अशोक पवार, लहुजी शिंदे, विनोद डुणुंग, रमेश मोरे, भाऊ घोडके, कादर मलबारी यांच्?यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेत सामूहिक राष्ट्रगीत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व स्वराज्य महोत्सवांतर्गत महापालिकेच्या वतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात झाले. 11 वाजता अग्निशमन विभागाच्या वतीने सायरन वाजविण्यात येऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. महापालिकेच्या वर्कशॉप व इतर कार्यालयांतही राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्‍त आयुक्‍त नितीन देसाई, उपायुक्‍त शिल्पा दरेकर, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ.रमेश जाधव उपस्थित होते.

पूर ओसरलेल्या भागात पाच टन गाळाचा उठाव

पूर ओसरलेल्या पंचगंगा नदीघाट परिसरातून 5 टन कचरा व गाळाचा उठाव करण्यात आला. हा कचरा 1 डंपर व 1 जेसीबीद्वारे गोळा करण्यात आला.

पंचगंगा नदीघाट परिसर व जामदार क्लब या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साठला होता. महापालिका आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पंचगंगा नदीघाट परिसरात पूर ओसरलेल्या भागातील कचरा व गाळ उठाव करून तेथे औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात आली. स्वच्छता मोहीम मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, मुकादम व 20 कर्मचार्‍यांनी केली.

Back to top button