

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २९,४०९ शेतकर्यांना सुमारे २०० कोटी रुपये कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित कर्जमाफीची रक्कम समजणार आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेच्या तुलनेत सध्याच्या कर्जमुक्ती योजनेत थकबाकीदार शेतकर्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकर्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी (दि. १०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा जोतिराव फुले योजनेत कर्जमाफी घेतलेल्या शेतकर्यांना या कर्जमाफीत ५० हजार रुपये कर्जमाफी देण्याची अट रद्द करत सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली.
थकबाकी शेतकर्यांची संख्या निम्म्याने घटली
जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत ४८ हजार ८५७ शेतकर्यांना २८५ कोटी रुपये कर्जमाफी देण्यात आली. आताच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या २९ हजार ४०९ शेतकर्यांची माहिती शासनाकडे ऑनलाईन सादर केली आहे. दोन्ही कर्जमाफीतील आकडेवारी पाहता जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.
‘त्या’ शेतकर्यांची संख्या यादी प्रसिध्दीनंतरच समजणार
जिल्ह्यातील २ लाख ६० हजार शेतकर्यांना जिल्हा बँकेसह अन्य बँकांच्या माध्यमातून २५८७ कोटींहून अधिक पीककर्जाचे वितरण केले आहे. यापैकी २९४०९ थकबाकीदार शेतकर्यांची माहिती शासनाकडे सादर केली आहे. यामध्ये महात्मा जोतीराव फुले योजनेत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकर्यांची संख्या पात्र शेतकर्यांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर समजणार आहे.
नियमित कर्जफेड करणार्यांनाही दिलासा
प्रोत्साहन अनुदानसाठी २०२६-२७ ची कर्जफेड करण्याची अटही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केली. जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख शेतकर्यांकडून नियमित कर्जफेड केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानचा आकडा मोठा असणार आहे. २०२६-२७ मधील कर्जफेडची अट रद्द केल्याने नियमितपण कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.