काँग्रेसचा विचार कधीच संपणार नाही | पुढारी

काँग्रेसचा विचार कधीच संपणार नाही

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा भारताला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा टाचणीही तयार होत नव्हती. मात्र, काँग्रेस पक्षाने देशात पायाभूत सुविधा निर्माण करून देशात विकासाची घोडदौड सुरू केली. सर्वसामान्यांसाठी आधार असणारा काँग्रेसचा विचार संपविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. परंतु काँग्रेसचा विचार कधीच संपणार नाही, असे प्रतिपादन आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी केले. हळदी (ता. करवीर) येथे आझादी गौरव पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.

घोटाळ्याचा बागुलबुवा उभा करून केंद्र सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाला ईडीच्या माध्यमातून त्रास देत आहे. मात्र, गांधी कुटुंब निरपराध आहे. इन्कमटॅक्स, ईडी या संस्थांच्या धाकाने भाजप देश चालवू लागले आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते भाजपचा प्रयत्न हाणून पाडतील, असे पाटील म्हणाले. काँग्रेसने विकास करून मते मागितली. मात्र, भाजप हे लोकांना त्रास देऊन आणि अटक करण्याची भीती घालून मते मागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती दुप्पट केल्या. घरगुती गॅस 1100 रुपयांवर गेला आहे. खतांसह अन्‍नधान्यावरही कर लावून दरवाढ केली. 23 सरकारी कंपन्या खासगी उद्योगपतींना विकल्या आहेत.

महागाईमुळे सामान्य जनता व शेतकरी भरडला जात आहे, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, बी. ए. पाटील, विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील-सडोलीकर, पी. डी. धुंदरे, उदय पाटील-सडोलीकर, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे उपस्थित होते. भोगावतीचे संचालक प्रा. शिवाजीराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दिगंबर मेडसिंगे यांनी आभार मानले.

Back to top button