कोल्हापूर : महावितरण कार्यालय-एस. टी. वर्कशॉप रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य | पुढारी

कोल्हापूर : महावितरण कार्यालय-एस. टी. वर्कशॉप रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ताराबाई पार्कमधील महावितरण कार्यालय ते एसटी वर्कशॉप या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, असा प्रश्‍न वाहनधारकांसह नागरिकांना पडला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. अनेक भागांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालय ते पितळी गणपती हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या परिसरात आरटीओ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, वन विभाग अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. या भागात शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील यांचेही कार्यालय याच परिसरात आहे. येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

दुचाकी, चारचाकी वाहनांसह केएमटीची वाहतूक या परिसरात सातत्याने सुरू असते; मात्र रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. जागोजागी मोठे खड्डे असल्याने ते चुकविताना वाहनधारकांची विशेषत: दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा खड्डेे चुकविताना किरकोळ अपघात घडत आहेत. एवढ्या वर्दळीचा रस्ता असूनही महापालिका प्रशासनाने या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शहरात इतरत्र मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना या रस्त्याकडे लक्ष द्यायला महापालिका अधिकार्‍यांना वेळ नाही. किमान खड्डेे तरी बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button