‘हर घर तिरंगा’साठी वस्त्रनगरी सज्ज | पुढारी

‘हर घर तिरंगा’साठी वस्त्रनगरी सज्ज

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबविण्यात येणार्‍या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी वस्त्रनगरी इचलकरंजीत जय्यत तयारी सुरू झाली आहे. इचलकरंजीसह परिसरात लाखाहून अधिक घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठी ध्वजवाटपासह अन्य विविध तयारीलाही वेग आला आहे. शहर यामुळे तिरंगामय होणार आहे. देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ हे नागरिकांमध्ये देशभक्‍तीचे स्फुरण निर्माण करणारे अभियान सुरू केले आहे. नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, संस्था, खासगी संस्था आदींसह विविध ठिकाणी तिरंगा तीन दिवस डौलाने फडकणार आहे.

यासाठी प्रशासनासह शहरातही जल्‍लोषपूर्ण वातावरणात जय्यत तयारी सुरू आहे. इचलकरंजी शहरात 58 हजार मिळकती असल्या, तरी शहर परिसरात घरोघरी तिरंगा फडकावण्यासाठी हात राबत आहेत. गल्‍ली, सोसायट्या त्याचबरोबर भागाभागांत तिरंगा ध्वजाचे वाटप, तीन दिवस ध्वज लावण्याचे नियोजन, स्वातंत्र्यदिनी निघणारी रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सोशल मीडियावरही अमृत महोत्सवानिमित्त संदेश व शुभेच्छा आदींची रेलचेल सुरू आहे.

यामध्ये तरुणाईही मागे नाही. सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष याबरोबरच शाळांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. जनजागृतीसाठी रॅली, भित्तिपत्रके, रिक्षांवर जागृतीपत्रके यासह अन्य उपक्रमही राबविण्यात येत आहेत. महापालिकेकडूनही ध्वजवाटपाचे काम गतीने सुरू आहे. मोफत तसेच विविध नागरिकांकडून ध्वज खरेदी करून ते घरांवर लावण्यासाठी नियोजनाची लगबग आज दिसून येत होती. प्रांत कार्यालय, राजाराम स्टेडियम, जुनी नगरपालिका, नवीन नगरपालिका, पुरवठा कार्यालय, पोलिस ठाणे, वाहतूक शाखा आदींसह शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था आदींच्या इमारतींवरही राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका जुनी इमारत, काँग्रेस कमिटीसह विविध संस्थांवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. एकूणच शहरातील वातावरण राष्ट्रभक्‍तीने भारून गेले आहे.

अडीच किलोमीटर लांबीच्या ध्वजाचे आकर्षण

इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज फडकावण्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज पुतळा ते डीकेटीई हा शहरातील प्रमुख मार्ग या अडीच किलोमीटर लांबीच्या ध्वजामुळे व्यापणार आहे. शहराच्या लौकिकात भर घालणार्‍या या ध्वजाचे आकर्षण निर्माण झाले आहे. तब्बल साडेसात हजार मीटर कापड वापरून करण्यात आलेला हा ध्वज अत्यंत दिमाखात फडकावण्यात येणार आहे.

Back to top button