

दिलीप भिसे
कोल्हापूर : महापालिकेतील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांसह आघाड्यांचीही चढाओढ सुरू आहे. उमेदवारांनीही प्रचाराचा धुरळा उडविला आहे. 20 प्रभागांत 327 उमेदवार भवितव्य अजमावित असतानाच एकेकाळी गुन्हेगारी वर्तुळात दहशत माजविणारे आणि गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले 29 उमेदवार राजकीय भवितव्यासाठी आखाड्यात उतरल्याने महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
हे 29 उमेदवार पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खासगी सावकारीसह खंडणी वसुली, गर्दी-मारामारीचेही त्यांच्याविरुद्ध रेकॉर्ड आहे, तर काहींनी स्वची उमेदवारी पुढे न करता कुटुंबीयातील अन्य सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. स्वत:सह साथीदारामार्फत प्रभागांतर्गत व्यूहरचना करण्यातही मंडळी व्यस्त आहेत.
जुना राजवाडा हद्दीत 10, राजारामपुरी 7, शाहूपुरी 7, लक्ष्मीपुरी पोलिस 4 तर करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांसह साथीदारांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. स्वत: राजकीय आखाड्यात न उतरता कुटुंबीयांतील सदस्यांसाठी फिल्डिंग लावणार्या आणि एकेकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. काही मंडळींकडून हमीपत्र घेण्याचाही पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. बहुतांशी प्रभागांत सीसीटीव्ही कॅमेर्यामार्फत हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारासह समर्थकांच्या हालचालीही कॅमेर्याद्वारे टिपण्यात येत आहेत.
अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी 177 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 108 गुंडांना निवडणूक काळासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या 20 गुंडांना एक, दोन वर्षांसाठी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांकडून पोलिस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आले आहेत. काही प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.