राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा थोर राजकीय नेत्यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा पोरखेळ सुरू आहे. खरा मुख्यमंत्री कोण? असे थेट विचारले जात आहे. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये गृहमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस सरकारच बेकायदेशीर असल्याने ते बरखास्त करावे लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सकाळी काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार पाडताना पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दुसर्‍या पक्षात सामील व्हावे लागते हे बहुतेक बंडखोरांना सांगण्यात आले नसावे. अध्यक्षांची निवड बेकायदेशीरपणे करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अध्यक्ष निवड राज्यपालांनी न्यायप्रविष्ट बाब म्हणून अखेरपर्यंत अडविली. भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार केल्यानंतर मात्र न्यायप्रविष्ट बाब असताना देखील लगेच अध्यक्ष निवड केली.या सरकारने पूर्वीच्या सरकारचे सर्व निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली. असा प्रकार यापूर्वी कधी झाला नव्हता. या सर्व प्रकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

छोट्या पक्षांनी एकत्र यावे

भाजपला रोखण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे. सध्या काँग्रेस थोडी क्षीण झाली आहे. परंतु हीच परिस्थिती कायम राहणार नाही. त्यामुळे छोट्या पक्षांना एकत्र येण्याची गरज आह, असेही चव्हाण म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, महिला शहर अध्यक्ष संध्या घोटणे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित होते.

सत्तार यांना शिक्षणमंत्री करा

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी टीईटीच्या परीक्षेत केलेल्या गैरप्रकाराबद्दल त्यांचे टीईटीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत विचारता चव्हाण यांनी, सत्तार यांना आता मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री करा, अशी टिपणी केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटल्याचे मान्य करून त्यांनी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे सांगितले.

Back to top button