कोल्हापूरच्या पोलिसाने देहूच्या शेतकर्‍याकडे मागितली 1 कोटी लाच | पुढारी

कोल्हापूरच्या पोलिसाने देहूच्या शेतकर्‍याकडे मागितली 1 कोटी लाच

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठात जमीन वादासंदर्भात दाखल खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून देहू रोड (पुणे) येथील शेतकर्‍याकडून एक कोटी रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संशयित कॉन्स्टेबल जॉन तिवडे पसार झाला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. फेब्रुवारी 2022 मध्ये लाचेची मागणी करण्यात आली होती. आठवड्यापूर्वी झालेल्या पडताळणीत महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणांतर्गत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने एक कोटी रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्‍न झाल्यामुळे तिवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कॉन्स्टेबलविरुद्ध यापूर्वी दाखल गुन्ह्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याला निलंबित केले आहे, असेही बुधवंत म्हणाले.

देहू गाव (ता. हवेली) येथील 70 वर्षीय शेतकर्‍याच्या जमिनीसंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे तीन दावे दाखल करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये एका अनोळखी व्यक्‍तीने तक्रारदार शेतकर्‍याशी संपर्क साधला. त्याने तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टीबाबत बोलायचे आहे. त्यासाठी मला समक्ष भेटा, असा निरोप दिला. तक्रारदार व्यक्‍तीने संबंधिताशी संपर्क केला असता त्याने शेतकर्‍याला कोल्हापूरमध्ये येण्यास सांगितले.

शेतकर्‍यासमवेत हॉटेलमध्ये बैठक

संबंधित तक्रारदार 22 मार्च 2022 रोजी कोल्हापूर येथे आले. त्यांनी संपर्क साधल्यानंतर शेतकर्‍यास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्यास सांगण्यात आले. शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित व्यक्‍तीला गाठले असता ती व्यक्‍ती पोलिस कॉन्स्टेबल असल्याचे समजले. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार व्यक्‍ती व संशयिताची मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये बैठक झाली.
निकाल आपल्या बाजूने करणार या चर्चेत संशयित तिवडे याने वृद्धाला स्वतःची ओळख करून दिली. आपण कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असून महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी आपले चांगले संबंध आहेत, असे त्याने सांगितले. आपल्या जमिनीच्या वादासंदर्भात तीन खटले दाखल आहेत. संबंधित दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने लावून देऊ शकतो, असे त्याने सांगितले.

एक कोटी रुपये द्यावे लागतील

तुमच्याविरोधात दावा दाखल केलेल्या पार्टीने याच कामासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. मात्र तोच निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी आपण किती देणार बोला, असा सवाल करून त्याने शेतकर्‍याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली
संशयिताविरुद्ध फिर्याद तक्रारदार व्यक्‍तीने घरच्या मंडळींशी चर्चा करतो, असे सांगितले. तेथून त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्याने पोलिस कॉन्स्टेबल जॉन तिवडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली

तक्रारदार व्यक्‍तीने आठवड्यापूर्वी पोलिस उपाधीक्षक बुधवंत यांच्याशी पुन्हा संपर्क साधला.त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एक कोटी रुपयांची लाचेची जी मागणी करण्यात आली होती, त्याची पडताळणी केली. त्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल संशयित जॉन तिवडे याने पैशाची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बुधवंत यांनी सांगितले. कोट्यवधींची जमीन ज्या जमिनीवरून वाद आहे ती जमीन देहू गाव येथील आहे. हवेली तालुक्यात जमिनीचे दर सर्वाधिक आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या जमिनीसाठी वाद सुरू आहे. त्यातूनच हा लाच मागणीचा प्रकार घडला.

Back to top button