साडेसात लाखांपैकी केवळ दोनच शाळाबाह्य विद्यार्थी! | पुढारी

साडेसात लाखांपैकी केवळ दोनच शाळाबाह्य विद्यार्थी!

कोल्हापूर : प्रवीण मस्के शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने राबविलेल्या ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ मोहिमेत 7 लाख मुलांचे सर्वेक्षण केल्यानंतर कोल्हापूर शहरातील केवळ दोनच विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. शाळाबाह्य मुलांची दिलेली आकडेवारी पाहता शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थी शोध मोहिमेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
वंचित, गरीब कुटुंबातील मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोफत शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. परंतु आजही हजारो विद्यार्थी शाळापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 5 ते 20 जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रापआऊट’ मोहीम राबविण्यात आली. यात 3 ते 18 वयोगटातील आणि दिव्यांग शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी घरोघरी जाऊन तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन करण्यात आल्या.

मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 7 लाख 34 हजार 955 कुटुंबाचा अंगणवाडी सेविका, शिक्षकांनी सर्व्हे केला. यात केवळ कोल्हापूर महापालिका क्षेत्रात 9 वी आणि 10 वी चे दोन विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. शहरी भागात स्थलांतरित होऊन 84 मुले-मुली आल्या. परगाव व इतर तालुक्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांची संख्या 25 आहे. परजिल्ह्यातून 39 व परराज्यातून 20 विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आहेत. मार्च-2021 मध्ये 48 शाळाबाह्य विद्यार्थी तर यावर्षी मे पूर्वी केलेल्या सर्वेक्षणात 85 शाळाबाह्य विद्यार्थी आढळले होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

यावर्षी जिल्ह्यातील शाळा 15 जून रोजी सुरू झाल्या. शासनाच्या नियमावलीनुसार 30 दिवस सतत शाळेत गैरहजर विद्यार्थी शाळाबाह्य समजले जाते. राज्यस्तरावरून मोहिमेचा कालावधीच व्यवस्थित ठरविला गेला नाही. मग, शाळाबाह्य विद्यार्थी सापडणार कसे? हा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. मोहिमेची सांख्यिकीय माहिती एकत्रिकीकरणासाठी ऑनलाईन लिंक तयार करण्यात आली. जिल्हा, तालुका व गावस्तरावर समित्या गठित करण्यात आल्या. गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांची मोहिमेत मदत घेण्यात आली. तरीही जिल्ह्यात केवळ दोनच विद्यार्थी शाळाबाह्य कसे? असा सवाल शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.

शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांचे शिक्षण विभागाने केलेले सर्वेक्षण चुकीचे वाटते. ही मोहीम ऊस हंगाम सुरू झाल्यावर, हंगाम संपल्यानंतर व शाळा सुरू होण्यापूर्वी राबविणे गरजेचे आहे. यातून खर्‍या अर्थाने शाळाबाह्य, स्थलांतरित विद्यार्थी संख्या लक्षात येईल. आजही कचरावेचकपासून इतर अनेक विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. हे सर्वेक्षण करून आम्ही शिक्षण विभागास दाखवून देऊ.
– साताप्पा मोहिते, जिल्हाध्यक्ष,
अवनि आयोजित स्वाभिमानी बालहक्‍क अभियान

Back to top button