Kolhapur : महापालिकेची राजकीय समीकरणे बदलणार | पुढारी

Kolhapur : महापालिकेची राजकीय समीकरणे बदलणार

कोल्हापूर : सतीश सरीकर तब्बल दीड-पावणेदोन वर्षांनंतर आणि दोन-तीन वेळच्या बदलानंतर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. राजकीय पक्षांसह इच्छुकांनीही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. कोल्हापूर शहरात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तोपर्यंत बुधवारी राज्य शासनाने नगरसेवकांची संख्या बदलली. प्रभाग रचनेविषयी ठोस निर्णय नसल्याने संभ्रमावस्था आहे. परिणामी सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एक प्रभाग, एक नगरसेवक झाल्यास अपक्षांना पुन्हा संधी आणि बळ मिळणार आहे. चार प्रभागांचा एक वॉर्ड झाल्यास पक्षीय राजकारणाला बळकटी येणार आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार आणि प्रभाग रचनेनुसार राजकीय पक्षांना नव्याने सत्तेचा सारिपाट मांडावा लागणार आहे.

महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 92 वरून 81 झाल्याने एकदम 11 नगरसेवक कमी होणार आहेत. प्रभाग रचनाही पूर्ण बदलावी लागणार आहे. आरक्षण सोडतही नव्यानेच काढावी लागणार आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या आणि मतदारही बदलले जाणार आहेत. राजकीय पक्षांना त्यानुसार फेरमांडणी करावी लागणार आहे. त्या-त्या प्रवर्गातील इच्छुक शोधताना आणि बंडखोरी रोखताना नेतेमंडळींना घाम फुटणार आहे. कारण आता प्रशासकीय पातळीवर निवडणुकीचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने त्या-त्या प्रभागातील लढतीही स्पष्ट झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी, शिवसेना आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आताच निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे पुन्हा गणिते बदलणार आहेत. नगरसेवकांची संख्या बदलल्याने आणि प्रभाग रचनाही बदलणार असल्याने सर्वच पक्षांना त्यानुसार व्यूहरचना करावी लागणार आहे. त्याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. ऑगस्ट 2022 आला तरीही अद्यापपर्यंत निवडणुका होऊन सभागृह अस्तित्वात आलेले नाही. कोरोनासह विविध कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. यापूर्वी एक प्रभाग रचना आणि त्रिसदस्य प्रभाग रचना करण्यात आली होती. शासनाच्या निर्णयानुसार आता प्रभाग रचना आता तिसर्‍यांदा बदलावी लागणार आहे. मतदार याद्याही नव्याने कराव्या लागणार आहेत. निवडणुकीसाठी आरक्षण सोडत चौथ्यांदा काढावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीविषयी सर्वांचे आडाखे बदलले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेमुळे आणि आरक्षणामुळे संधी गेलेल्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर आता संधी असलेल्या उमेदवारांना नव्या रचनेमुळे थांबावे लागू शकते.

अनेक इच्छुक गेल्या चार-पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत. 2015-2020 या सभागृहाची मुदत संपल्यानंतर तर अनेक इच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधली होती. 2015 सालातील मेपासूनच कोल्हापुरात निवडणुकीचे रणांगण सुरू झाले होते. अनेकांनी तर सोशल मीडियावर प्रचाराचा नारळही फोडला होता. विविध कारणांनी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु कोव्हिडमुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले. त्यानंतर वेळोवेळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असतानाच कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्याला स्थगिती येते किंवा रद्द होते. आता मात्र इच्छुकांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईलच या आशेने इच्छुक कामाला लागले आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षणावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

राजकीय पक्ष स्वतंत्र लढणार की आघाड्या?

काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते. आ. हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. परंतु आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक निवडून येतात. भाजप-ताराराणी आघाडी खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा शिवसेना गट स्वतंत्र लढणार की भाजपसोबत आघाडी करणार हे अद्याप स्पष्ट नाही. एक सदस्य प्रभाग झाल्यास राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागणार आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास मात्र नेतेमंडळींना उमदेवार शोधताना नाकीनऊ येणार आहे.

Back to top button