जिल्हा परिषदेचे पूर्वीप्रमाणेच 67 मतदारसंघ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदारसंघांची नवीन रचना रद्द केल्यामुळे जिल्हा परिषदेचे पूर्वीप्रमाणे 67, तर पंचायत समित्यांचे 134 मतदारसंघ राहणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पूर्वी कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 अशी निश्चित केली होती. त्यानुसार छोट्या जिल्ह्यात सदस्यांची संख्या 50 असे. जिल्हा कितीही मोठा असला तरी 75 पेक्षा सदस्यांची संख्या अधिक करता येत नव्हती. गेल्या 30 वर्षांत लोकसंख्या आणि मतदानामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जि.प.च्या सदस्य संख्येत वाढ केली. जिल्हा परिषदेचे कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 9 ने वाढवून 76 झाली होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली. जिल्हा परिषदेचे 76 मतदारसंघ, तर पंचायत समित्यांचे 152 मतदारसंघ निश्चित करून त्याची आरक्षण प्रक्रिया देखील राबविली होती. मतदारसंघांचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ग्रामीण भागात राजकीय हालचालींना गती आली होती. राज्यात सत्तेवर आलेल्या नवीन शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचा व निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. अजूनही तो सुरूच आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत घेतलेले निर्णयदेखील अपवाद ठरले नाहीत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आघाडी सरकारने कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या करण्याचा निर्णय राज्यातील नव्या सरकारने बुधवारी रद्द ठरविला. 2017 मध्ये जी मतदारसंघांची रचना होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढविलेली सदस्यांची संख्या कमी होणार आहे. शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचे नव्या शासनाने ठरविले आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची संख्या पूर्वीइतकीच राहणार आहे.
दै.‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले
दै. ‘पुढारी’ने ‘एक प्रभाग, एक नगरसेवक’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या पूर्वीइतकीच राहील, असे म्हटले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
अशी राहील मतदारसंघांची संख्या
तालुका जिल्हा पंचायत परिषद समिती
आजरा 3 6
भुदरगड 4 8
चंदगड 4 8
गडहिंग्लज 5 10
गगनबावडा 2 2
हातकणंगले 11 22
कागल 5 10
करवीर 11 22
पन्हाळा 6 12
राधानगरी 5 10
शाहूवाडी 4 8
शिरोळ 7 16