(व्हिडिओ) खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा; शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

(व्हिडिओ) खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा; शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या खा. धैर्यशील माने यांच्या निषेधार्थ त्यांच्या निवासस्थानावर शिवसेनेच्या वतीने आज (दि. 25) मोर्चा काढण्यात आला. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हातात भगवा झेंडा आणि फलक घेत खा. माने यांच्या घरावर धडक मारली. यावेळी त्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. निवासस्थानी जमावबंदी आदेश लागू केला आहे. आज सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है, उद्धव ठाकरेंशी बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, रवीकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

अस्तित्व संपत आलेल्या माने गटाला शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी देऊन ऊर्जितावस्था आणली. माने कुटुंबाचा सन्मान केला. असे असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. दिवंगत माजी खा. बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नाही, असा इशारा असे शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी यावेळी दिला.

निवासस्थानी जमावबंदी

खा. धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता. परंतु आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना रोखताना पोलिसांची दमछाक झाली. अखेर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

कोल्हापुरात आल्यावर भूमिका स्पष्ट करू

दिल्‍लीत सुरू असलेल्या अधिवेशनाची सांगता झाल्यावर कोल्हापुरात आल्यानंतर माझी भूमिका मी स्पष्ट करेन. तोपर्यंत संयम राखून मतभेद होणार नाहीत, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का व कशामुळे घडले? त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून समजू शकतो. या मोर्चाला कोणत्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते, बंधू -भगिनी आपलेच आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणे माझं कर्तव्य आहे. अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात येताच आपण भूमिका स्पष्ट करू, असे खा. माने यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडली आहे.

 

Back to top button