पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. राणे यांना अटक केली तर संपूर्ण महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन होईल, असा इशारा सिंधुदूर्गचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला.
ते राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात होण्याआधी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, 'सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. राणे जे बोलले ती ठाकरी भाषा आहे. बाळासाहेबांबरोबर ४० वर्षे राणे राहिले आहेत.
ठाकरी भाषेवर गुन्हे दाखल करायचे असतील तर प्रत्येक दसरा मेळाव्यात बोलल्याबद्दल प्रत्येक ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा देशाचा स्वातंत्र्यदिन कधी आहे हेही मुख्यमंत्र्यांना माहीत नाही.
हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, तर मुख्यमंत्र्यांनी देशाच्या केलेल्या अपमानाला ठाकरी भाषेत उत्तर आहे.
दसरा मेळाव्यात ठाकरे आक्षेपार्ह भाषेत बोलतात. आर. आर. पाटील यांच्यासारखा माणूस भाषणात ढोपरापासून कोपरापर्यंत सोलण्याची भाषा बोलत होते. त्यामुळे राणे जे बोलले ते आक्षेपार्ह नाही.
ते पुढे म्हणाले, 'शिवसेना असो की सरकार आम्हाला कुणी रोखू शकत नाही. सरकार घाबरले आहे.
राणेंना अटक झाली तर कोकणातील सर्व भाजप कार्यकर्ते अटक करून घेतील. त्याही पलिकडे आम्हाला अटक करण्यीच सरकारमध्ये हिंमत नाही.
काय म्हणाले राणे…
'किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,'अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.