विशाळगडाच्या उर्वरित बुरुजांनाही धोका

विशाळगडाच्या उर्वरित बुरुजांनाही धोका
Published on
Updated on

विशाळगड : सुभाष पाटील विशाळगडाच्या पूर्वेकडील चार दगडी बुरुजांच्या उभारणीने शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळाला. मात्र, बुधवारी ढासळलेल्या एका दगडी बुरुजाच्या घटनेने उर्वरित बुरुजांना धोका निर्माण झाला आहे. 4 कोटी 95 लाखांच्या निधीतून बुरुजाच्या डागडुजीची कामे केली. मात्र, उर्वरित कामासाठी पुरातत्त्व खाते इकडे फिरकलेच नाही. अनेक कामे अर्धवट राहिल्याने पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. निधीच शिल्लक नसल्याचा कांगावा पुरातत्त्व खाते करीत असले तरी नेमका निधी कुठे मुरला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य शासनाने गड, किल्ले संवर्धन मोहिमेंतर्गत विशाळगडासाठी 4 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर केला. या निधीमधून गडाच्या भिंती, बुरूज, दरवाजे, पाण्याचे साठे, मंदिरांची डागडुजी, पडकी कमान, शिवकालीन विहिरी आदी कामे केली जाणार होती. बुरुज, तटबंदीतील झाडे-झुडपे, गवत काढून तसेच जमिनीखाली गाडलेले दगड उत्खनन करून पूर्वेकडील चार बुरुजांची डागडुजी केली. चारही बुरुजांची सांगड एकमेकांशी आहे. बुधवारी रात्री बुरुज कोसळल्याने डागडुजीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. निकृष्ट कामाचा फटका या शिवकालीन ठेव्याला बसला आहे. कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

शिवकालीन मार्गावरील कमानीचे कामही रखडले आहे. बुरुजांशिवाय इतर कामांना 'खो' बसला आहे. दगड बसविताना चुन्याचा वापर करणे बंधनकारक होते. मात्र, ढासळलेल्या बुरुजामध्ये याची कमतरता जाणवत आहे. गडावर 33 स्थळे आहेत. बहुतांश वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत. मुंढा दरवाजा ते पायथ्यापर्यंत किमान तेरा कमानी होत्या, असे सांगितले जाते. काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या. त्यापैकी एका कमानीचे अस्तित्व असले तरी तिची पडझड झाली आहे. या कमानीचीही दुरुस्ती हाती घेतली होती, मात्र ती पूर्णत्वास गेली नाही.

रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार? याकडे शिवप्रेमीचे लक्ष लागले आहे. मंजूर निधीतून होणारी बरीच कामे अपूर्ण आहेत, ती त्वरित पूर्ण करावीत, तसेच पंतप्रतिनिधी वाडा, बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे बंधूंच्या समाध्या, नरसिंह मंदिर, मारुती टेक मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, भूपाल तलाव, आदींसह अन्य वास्तूंच्या डागडुजीची कामे हाती घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news