Ambabai Temple | अंबाबाईच्या महाप्रसादाचा २५ हजार भाविकांना लाभ

नवरात्रौत्सवाची सांगता; श्री महालक्ष्मी भक्त मंडळ व देवस्थान समितीचा संयुक्त उपक्रम
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात सोमवारी आयोजित भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात सुमारे २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळोखे, महादेव दिंडे आणि महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटपाला प्रारंभ झाला. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या गहू, तांदूळ, डाळ, गूळ, साखर, तेल आणि विविध भाज्यांचा वापर करून खीर, भात, आमटी आणि भाजी असा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. परगावातील देणगीदार भाविकांनाही प्रसादाचा लाभ घेता यावा, यासाठी त्यांना घरपोच प्रसाद पाठविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमाचे नियोजन श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. मंदिर परिसरातील भाविक तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.

अन्नपूर्णा देवीच्या रूपातील अंबाबाईचे मनमोहक दर्शन

नवरात्रौत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त सोमवारी श्री अंबाबाईची अन्नपूर्णा देवीच्या रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. देवीचे मनोहारी रूप पाहण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. भक्तिमय वातावरणात देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

logo
Pudhari News
pudhari.news