शाहू महाराजांनी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र बनवून संघर्ष केला | पुढारी

शाहू महाराजांनी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र बनवून संघर्ष केला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा आपल्या विचार आणि आचाराने समतेचा पुरस्कार करणार्‍या राजर्षी शाहू महाराज यांनी प्रतिगामी शक्‍तींचा मुकाबला करण्यासाठी धर्मक्षेत्रास कुरुक्षेत्र बनवून संघर्ष सुरू केला, प्रतिपादन डॉ. राजा दीक्षित यांनी केले. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू जयंती निमित्त आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘राजर्षी शाहूंचा धर्मविचार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या धर्मविचारांबाबत दोन टप्प्यात मांडणी करावी लागते. पहिल्या टप्प्यात शाहू महाराज सर्वसामान्य हिंदुप्रमाणे आस्तिक होते. वैयक्‍तिक जीवनात ते सर्वसामान्यांप्रमाणे सर्व व्यवहार करीत. मात्र 1899 मध्ये घडलेल्या वेदोक्‍त प्रकरणामुळे त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. या घटनेनंतर विद्रोही बनले. त्यांनी देव आणि माणूस यांच्या मध्यस्थ कोणी नसावा, अशी भूमिका घेतली. समाजसुधारणांच्या चळवळींना प्रोत्साहन दिले. पुरोहितशाही आणि ब—ाह्मणी वर्चस्वाविरोधात त्यांनी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष करीत असताना त्यांनी आचार आणि विचारात विलक्षण एकरूपता ठेवली.

डॉ. दीक्षित म्हणाले, पौरोहितशाही-ब—ाह्मणी वर्चस्व संपविण्यासाठी शाहू महाराज यांनी वैदिक स्कूल आणि क्षात्रजगद‍्गुरूची नियुक्‍ती केली. वैदिक स्कूलच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना पौरोहित्य करण्याची संधी निर्माण केली. या सर्व कामात सनातन्यांच्या टीकेला भीक घातली नाही. तसेच पुरोगाम्यांच्याही टीकेकडे दुर्लक्ष केले. ब—ाह्मणी नोकरशाहीला पर्यायी नोकरशाही निर्माण केली. 1899 ते 1922 या कालावधीत शाहू महाराज यांनी सामाजिक बंडखोरी सोडली नाही. विविध उदारमतवादी चळवळींना मदत व प्रोत्साहन दिले.
यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्वागत जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवतिके यांनी केले. प्रास्ताविक शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे डॉ. अवनीश पाटील यांनी केले. यावेळी राजदीप सुर्वे आणि डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

Back to top button