‘अग्निपथ’ला तरुणांचा तीव्र विरोध | पुढारी

‘अग्निपथ’ला तरुणांचा तीव्र विरोध

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने तिन्ही सैन्य दलांसाठी ‘अग्निपथ’ ही योजना सुरू केली आहे. संबंधित योजना तरुणांच्या फायद्यासाठी नाही, फक्त चार वर्षांच्या नोकरीसाठी वधू कोण देणार, चार वर्षांनंतर तरुणांचे भविष्य काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने ही योजना तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी अग्निपथविरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी सकाळी टेंबलाई मंदिर येथे ठिय्या आंदोलन केले. यानंतर पाचजणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

कृती समितीचे निमंत्रक संदीप गिड्डे-पाटील म्हणाले, संरक्षण मंत्रालयाने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ भरती प्रक्रियेविरोधात देशातील तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. याविरोधत आंदोलन सुरू आहे. भविष्याची तजवीज म्हणून युवकांचा सरकारी नोकरीकडे कल आहे; पण सैन्य भरतीमध्ये केवळ उमेदीची चार वर्षे नोकरी झाल्यानंतर पुढे कोणतीही हमी अग्निपथ योजनेमध्ये नाही. 2020 मध्ये घेतलेल्या शारीरिक व वैद्यकीय चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या युवकांची लेखी परीक्षा घेऊनही नियुक्त्या दिलेल्या नाहीत. 2020-21 मधील नियमित भरती प्रक्रियादेखील अद्याप प्रलंबित आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तरुणांचा ठिय्या आंदोलनात सहभाग होता. कृती समितीचे राहुल पाटील, अखिलेश पाले, समाधान पाटील, आण्णासाहेब काकडे, समाधान पाटील, आनंदराव पवार, महेश बोरनाक, तानाजी डोईफोडे यांच्यासह शेकडो तरुण उपस्थित होते.

कडक पोलिस बंदोबस्त

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभरात तरुणांकडून जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. इतकेच काय शासकीय कार्यालये, वाहनांना तरुण लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात टेंबलाई मंदिर परिसर आणि मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Back to top button